अमिषांना भुलू नका. तुमची – आमची आर्थिक कुचंबणा करून सत्ता आणि पदे घेणाऱ्यांना जागा दाखवा- मा.उदयसिंह पाटील
कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे यशवंतराव मोहिते, विलासकाका आणि मी प्रतिनिधीत्व केले. आमच्याकडून जनतेच्या विश्वासाला पात्र राहून विकासकामे झाली. मी मुख्यमंत्री असताना मतदारसंघाचा कायापालट झाला. कराड हा जिल्हा होईल, यादृष्टीने 1800 कोटी रुपयांची विकासकामे करता आली. तसेच गेल्या पाच वर्षात 1400 कोटींची विकासकामे करता आली. आपल्या भागात एमआयडीसी आहे पण विस्तार करणे जागेअभावी शक्य नाही त्यामुळे आय टी क्षेत्राकडे वळण हि काळाची गरज ओळखून कराडमध्ये आयटी हब उभारून रोजगार उपलब्ध करण्याचे माझे आता पुढील स्वप्न आहे. असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
काले (ता. कराड) येथील काँग्रेस महाविकास आघाडीच्या झालेल्या भव्य प्रचार सभेत ते बोलत होते. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, अॅ ड. रवींद्र पवार, अॅ ड. प्रतापराव जानुगडे, मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, अजितराव पाटील – चिखलीकर, पैलवान नानासाहेब पाटील, अधिकराव जगताप, नामदेव पाटील, नितीन काशीद, शिवाजीराव मोहिते, अॅ ड. नरेंद्र नांगरे – पाटील, धनंजय थोरात, नितीन थोरात, डॉ. अजित देसाई, वसंतराव पाटील, पांडुरंग पाटील, सर्जेराव गुरव, अॅ ड. शरद पोळ, उदय पाटील, संतोष थोरवडे, गीतांजली थोरात, संजय तडाखे, अक्षय सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते म्हणाले, मी जाहीरनामा समितीचा प्रमुख असल्याने राज्यातील जनतेचा आतील आवाज जाणून घेवून अभिवचने तयार केली. त्यामध्ये महिला, युवक व शेतकऱ्यांसाठी पाच अभिवचने दिली आहेत. या गोष्टीना शास्त्रीय व आर्थिक आधार घेतला आहे. कुठेही शासकीय तिजोरीवर भार न आणता विचारांती हा जाहीरनामा तुमच्यासमोर आणला. यात महिलांना दरमहा तीन हजार रुपये देणार आहे. महिलांना एसटीचा मोफत प्रवास, शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी देणार आहे. राज्यातील सर्व जनतेला २५ लाखापर्यंत आरोग्याचे मोफत उपचार देणार आहे. व पदवीधर युवकांना महिन्याला चार हजार रुपये देणार आहे.
ते म्हणाले, कोरोना काळात रुग्णांवर फुकट उपचार केले, असे कोणी म्हणत असेल तर ते साफ चुकीचे आहे. मी सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून रुग्णांसाठी मदत मिळाली. पण तुम्ही त्याचे मते मागण्यासाठी भांडवल करत आहात.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, पाणी योजनांची दहापटीने पाणीपट्टी वाढली. यावर लढा देवून आम्ही ती वसुली थांबवली. वारणेचे पाणी बंदिस्त पाईपलाईन करून कराड दक्षिणमध्ये येणार आहे.
अॅ ड. उदयसिंह पाटील म्हणाले, अमिषांना भुलू नका. तुमची – आमची आर्थिक कुचंबणा करून सत्ता आणि पदे घेणाऱ्यांना जागा दाखवा. पैलवान नानासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. दिपक तडाखे व राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. वसंतराव पाटील यांनी आभार मानले.
जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप म्हणाले, अतुल भोसले व त्यांच्या कुटुंबाने कृष्णा कारखान्याचे संस्थापक यशवंतराव मोहिते यांचा कारखान्याचा सभासदत्व असणारा मयत शेअर्स नातवाच्या अजून नावावर ट्रान्स्फर केलेला नाही. तसेच ऊसदर प्रतिटन ४९७ रुपयेने कमी देवून सभासदांना फसवले आहे. कारखान्याकडे उपपदार्थ निर्मिती असूनही रयत करखान्यापेक्षा कृष्णेचा दर कमी का मिळाला, याचे उत्तर मिळाले पाहिजे.