केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन
केळघर बाजारपेठ, या ठिकाणी रस्त्यालगत शाळा, दवाखाना तसेच इतर महत्त्वाची ठिकाणे आहेत. या मार्गावर विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते.
सदर रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून अनेक वाहने वेगाने जात असल्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी या ठिकाणी अनेक अपघात घडले असून भविष्यातही गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केळघर बाजारपेठ (पेठ) येथे तात्काळ झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या मारण्यात याव्यात तसेच आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्यात यावा. तसेच शाळा व दवाखान्याच्या परिसरात योग्य ती वाहतूक सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी.ही बाब नागरिकांच्या जीविताशी संबंधित अत्यंत गंभीर असून याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी.
अन्यथा, सदर मागणीची तात्काळ पूर्तता न झाल्यास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयाबाहेर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, याची संबंधित प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी.असे निवेदनात म्हंटले आहे. निवेदन देताना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष जावळी तालुका अध्यक्ष सुहास चव्हाण (आमन), सचिव प्रजित गायकवाड, चेतन चव्हाण,निमेश कांबळे, सारंग कांबळे, प्रकाश गाडे,सूर्यकांत जाधव तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.




