घराणेशाही म्हणताय तर घेता का डोक्यावर 1000 कोटी कर्जाच ओझं !-जेष्ठ नेते प्रतापराव पवार यांचा सवाल ?
सातारा, दि. १६ : विरोधकांना घराणेशाही आणि जबाबदारी स्वीकारणे यातील फरक समजत नाही. किसनवीर, खंडाळा कारखान्याच्या 1000 कोटी कर्जाची जबाबदारी घेतली ही काय घराणेशाही झाली का याचे उत्तर विरोधकांनी द्यावे, असा सवाल प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते प्रतापराव पवार यांनी टीका करणाऱ्या विरोधकांना केला.
प्रतापराव पवार पुढे म्हणाले, आबा, काका यांनी पदे हवी होती, असे नाही किंवा त्या पदांची आकांक्षाही त्यांनी बाळगली नाही. मात्र ज्यावेळी शेतकरी अडचणीत आला, कामगार संकटात आला त्यावेळी शेतकऱ्यांना, कामगारांना संकटातून बाहेर काढण्यासाठी संकटाची ही जबाबदारी स्वीकारली आणि सभासद, जनतेच्या आशीर्वादामुळे ती पेलण्यातही यशस्वी झाले. ही जबाबदारी यशस्वी झाली नसती आणि चुकून अपयश आले असते तर राजकारणातून बाद होण्याचा धोका होता.हा धोका सभासद, शेतकरी जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी पत्करला.
निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले संचालक आणि आबांनी पद घेतले आणि म्हणूनच मकरंद आबांवर विश्वासाने सभासदांनी ठेव म्हणून ३२ कोटी जमा केले. तुमची विश्वासाहर्ता सुताचा एक बंडल उधारीने घेण्यासाठी तरी बाजारात आहे का याचे आत्मचिंतन करा. जिल्हा बँकेला तात्यांच्या जागेवर जिल्हा कॅटगरीमधून अधिकच संचालक पद राखले, ती तात्यांची जागा होती म्हणून जिल्ह्यातील नेत्यांनी सहकार्य केले. जिल्हा बँकेचे चेअरमनपद नेते आणी संचालकांच्या पाठिंब्याने मिळवलें आणी वाईचा सन्मान जिल्हाभर वाढवला याचे कौतुक करायचे सोडून टीका काय करता, असा सवाल पवार यांनी केला.
चेअरमनपदाची जबाबदारी काका उत्कृष्टपणे बजावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर कारखाना व मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्यावर आबा अजितदादांबरोबर कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे गेले. गद्दारीच करायची असती तर मंत्रिपदाची माळ धुडकावून आबा मतदारसंघात कार्यकर्त्यांची समजूत काढायला मतदारसंघात परत आले नसते. शेवटी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा आग्रह आणि कारखाना वाचवण्यासाठीचा जनरेटा यामुळे त्यांनी अजितदादांची सोबत केली आणि लोकसभेला महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी झाले. नितीनकाका राज्यसभेची उमेदवारी मागायला गेले नव्हते. महायुतीचा उमेदवार निवडून आणला आणि जिल्ह्यात पक्ष वाढवयचा होता म्हणून स्वत:हून अजितदादांनी राज्यसभेची जबाबदारी सोपवली. वाईचा बहूमान वाढतोय राज्यसभेची खासदारकी वाईला मागच्या पन्नास वर्षात मिळाली नव्हती, ती मिळाली आणि त्यातूनही मतदारसंघाचा विकास करायचा एवढाच त्यांचा हेतू आहे. त्याश्विाय जिल्हाभर पक्ष वाढीसाठी काम करावे लागणार आहे आणि राज्यसभा हीही एक जबाबदारी आहे. कर्तृत्वाने मिळणाऱ्या सन्मानाचे विरोधकांनी एवढे वाईट वाटून घेऊ नये. तालुक्याचा नावलौकिक वाढतोय याचा अभिमान बाळगावा. जुन्या काळातील जेष्ठ नेत्यांनी जिल्ह्यात, राज्यात नेतृत्व केले त्याच पद्धतीने आबा, काकांकडून मतदारसंघाची मान उंचावेल अशीच कामगिरी होईल याची खात्री बाळगा म्हणजे उगाचच तुम्हाला त्रास होणार नाही. विरोधक फक्त तिकिटासाठी मिळणाऱ्या संधीचा लाभ घेण्यासाठी आबांच्या विरोधात गेले आहेत, पण आपण ज्या पार्टीत स्वार्थासाठी गेला आहात तेथील वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळीमध्ये तुम्ही म्हणता तशी घराणेशाही आणि जबाबदारी स्वीकारणारी किती मंडळी आहेत याची माहिती घेतली तर तुमची मती गुंग होईल आणि आमच्या नेत्यावर टीका करण्यासाठी तुम्हाला तोंड उघडावे लागणार नाही हे लक्षात येईल.
वाईकर आपली संस्कृती जपतील : पवार
वसंतदादांचे सरकार ज्यावेळी पवार साहेबांनी पाडले, त्यावेळी असे करु नका, असे यशवंतराव चव्हाण साहेब यांनी सांगीतले होते. मात्र त्यावेळी पवार साहेब यांनी ऐकले नाही. चव्हाण साहेब यांनी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळीही सोबत येतो येतो, असे सांगून ऐनवेळी त्यांना एकटे पाडले. मात्र मला सोडून गेला म्हणून याला पाडा त्याला गाढा, असे चव्हाण साहेब बोलले नाहीत. ती संस्कृती त्यांनी जपली होती. एखाद्या विषयावर एखाद्या कार्यकर्त्याने वैचारिक मतभीन्नतेमुळे वेगळी भूमिका घेतली म्हणून त्याला संपवण्याची भूमिका त्यांनी मांडली नाही, अशी आठवणही प्रतापराव पवार यांनी आवर्जून सांगीतली. वाईकर सुसंस्कृत आहेत आणि ते आबांना निवडूण आणून आपली संस्कृती जपतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.