सातारा जिल्ह्यातील शिवमंदिरे
सातारा जिल्हा शुरवीरांचा आणि क्रांतिकारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी सजलेल्या या जिल्ह्याला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला असून या सातारा जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे, पुरातन वास्तू, विविध गड किल्ले हे सर्व या जिल्ह्यातील दुर्गवैभव नेहमीच ट्रेकर्स व पर्यटकांना आकर्षित करत राहिलेले आहे. महाबळेश्वर, कास पठार, पाचगणी, ठोसेघर, सज्जनगड, भांबवली ही ठिकाणे तर सातारा पर्यटनाची प्रमुख केंद्रे आहेतच.
सातारा जिल्ह्यात शिलाहारकालीन गडकोट आणि छ. शिवराय व छ.संभाजीराजे यांच्या पराक्रमाचा ऐतिहासिक वारसा लाभलेले प्रतापगड, अजिंक्यतारा, दातेगड यासारखे अनेक गडकिल्ले आजही आपल्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देत दिमाखाने उभे आहेत. या २४ गडकोटाबरोबर श्रावण महिन्यात या सातारा जिल्ह्यातील काशीविश्वेश्वर, यवतेश्वर, कोटेश्वर, जबरेश्वर, पावकेश्वर, हरेश्वर, मेरुलिंग, सदाशिवगडावरील शंभू महादेव ही शिवमंदिरे पाहणे आणि अनुभवणे हा एक अतिशय आनंददायक सोहळा असतो.
या शिवमंदिरांचे प्राचीनत्व, मंदिरांची प्रवेशद्वारे आणि गणेशपट्टी तसेच कीर्तीमुखे, हेमाडपंथी बांधकाम, मंदिरांची रचना देवड्या, विहिरी, तलाव, शिल्पे, तटबंधी, मंदिराजवळील देवी देवता यांची मंदिरे, मंदिरांशी संबंधित दंतकथा याबरोबरच मंदीर इतिहास या सर्वांचा परिचय करून देण्यासाठी मी प्रा. सुर्यकांत अदाटे या श्रावण महिन्यात घेऊन येत आहे ‘सातारा जिल्ह्यातील शिवमंदिरे’ हे नवीन सदर……
या सदरात सातारा जिल्ह्यातील जवळपास बारा शिवमंदिरांचा परिचय करून देण्याबरोबरच मंदीर परिसरातील संस्कृती, शिल्पकला, कोरीव कलाकुसर, विरगळ आणि सतीशिळा यांची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे सर्व निसर्गप्रेमी, मंदीरप्रेमी, इतिहासाची आवड असणारे अभ्यासक व ट्रेकर्स यांच्यासाठी हे सदर पर्वणी ठरणार आहे.
खर तर पेशाने मी प्राध्यापक. लहानपणापासूनच मला फिरण्याची प्रचंड आवड होती. सातारा जिल्ह्यात नोकरीच्या निमित्ताने मी आलो. सहयाद्रीच्या कुशीतील मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असणाऱ्या सातारच्या गडकिल्ल्यानी आणि येथील प्राचीन शिवमंदिरांनी येथे आल्यानंतर मला वेडावून सोडले. इतिहास आणि भटकंती या दोन्हीची अत्यंत आवड असणारा मी प्रत्येक रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी भटकंतीला निघे आणि पाहता पाहता सातारा जिल्ह्यामधील २७ गड किल्ल्याची आणि शंभरभर शिवमंदिराची भटकंती पूर्ण झाली.
ही भटकंती करताना मी निसर्गात फिरण्याचा मनोमन आनंद घेतला. ही भटकंती करताना कधी मी एकटा तर कधी माझ्या साथीदारांच्यासह सातारा जिल्ह्यात फिरलो. मंदिरांचे सौंदर्य पहायचे असेल तर मंदीर परिसर तिन्ही ऋतूत अनुभवायचा असे ठरवून भटकंती करत मी निरीक्षण करून लिखाणाला सुरूवात केली. या लिखाणाचा फायदा सातारा जिल्ह्यातील भटकंती करणाऱ्या सर्वांनाच होईल तसेच शालेय विद्यार्थ्याना शिवमंदीरांच्या बाबतीत आत्मीयता निर्माण होईल आणि आपल्या गावातील तसेच परिसरातील शिवमंदिरांची माहिती त्यांना होईल या उद्देशाने मी भटकंती करून लिखाण केले. यामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मंदीरसंस्कृती संक्रमित होऊन आजचे विद्यार्थी भविष्यात सवर्धनासाठी पुढे येतील,त्याचबरोबर त्यांना सह्याद्री भ्रमणाची गोडीही लागेल. भटकंतीच्या माध्यमातुन आपला इतिहास, भूगोल, सभ्यता, संस्कृती यांचे प्रतिबिंब त्यांना पाहता येईल.
हे सदर लिहिताना मी शिवमंदिर परिसर, मंदीररचना, बांधकाम शैली, प्रवेशद्वारे, हेमाडपंथी रचना यांची ओळख करून दिलेली आहे. आज पडझड झालेल्या कित्येक मंदिरांना संवर्धित करण्याची गरज आहे. त्यांचे अवशेष सुस्थितीत राखण्यासाठी व त्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी आजच्या युवकांनी पुढाकार घेण्यासाठी हे सदर निश्चितच प्रेरणादायी ठरेल. भटकंती करून सन २०२४ च्या श्रावण महिन्यात शिवमंदीरांचे दर्शन करताना हे सदर निश्चितच आपल्याला मार्गदर्शक ठरेल. मी केलेले हे सातारा जिल्ह्यातील शिवमंदिरे हे सदर आपल्याला नक्कीच आवडेल असा विश्वास मला आहे.
प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,
देऊर
९९७५७५९३२५