राज्यनाट्यस्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रा. दिलीप जगताप यांच्या नाटकांचा बोलबाला
सात केंद्रांवर तब्बल दहा नाटके सादर होण्याची विक्रमी कामगिरी!
भुईंज : (महेंद्रआबा जाधवराव )६३ व्या राज्यनाट्यस्पर्धेच्या निमित्ताने सादर होणार्या नाटकांसाठी प्रायोगिक नाटककार प्रा. दिलीप जगताप यांच्याच नाटकांचा बोलबाला दिसत असून महाराष्ट्रातील सात केंद्रांवर त्यांची तब्बल दहा नाटके सादर होणार आहे. प्रायोगिक नाट्यक्षेत्रात अशी विक्रमी कामगिरी करण्याची किमया नाटककार प्रा. दिलीप जगताप यांच्या नाटकांनी केली असून महाराष्ट्रातील युवा कलावंतांना त्यांच्या नाटकांनी भूरळ पाडल्याचे सिद्ध झाले आहे. मुंबई, कल्याण, नाशिक, अहमदनगर, अकोला, सांगली, कोल्हापूर अशा सात केंद्रांवर त्यांच्या दहा नाटकांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये मुंबई येथे ‘चेहरामोहरा’ कल्याण, अकोला आणि अहमदनगर या केंद्रात ‘आला रे राजा’, नाशिक केंद्रावर ‘चेहरामोहरा’, ‘योद्धा’, ‘सशक्त’ आणि ‘जा खेळायला पळ’ तर सांगली येथे ‘बळ’, आणि कोल्हापूूर येथे ‘प्रश्नचिन्ह’ या नाटकांचे सादरीकरण होणार आहे. वाईच्या कृष्णाकाठावर जडणघडण झालेल्या प्रा. दिलीप जगताप यांनी प्रायोगिक नाट्यक्षेत्रात आपला आगळावेगळा दबदबा निर्माण केला असून सामाजिक आणि राजकीय विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण मांडणी हेही त्यांच्या नाटकांचे वेगळे वैशिष्ट्य ठरत आहे. गेली साठ वर्षांहून अधिक काळ ते सातत्याने लिहिते राहिले आहेत. प्रा. जगताप यांची परदेशी भाषांमधील भाषांतरित नाटकेही खूप गाजली आहेत. ज्येष्ठ सिनेअभिनेते अमोल पालेकर, नाटककार चं.प्र. देशपांडे, अतुल पेठे, सतीश आळेकर, विजय केंकरे आदींनी प्रायोगिक नाट्यक्षेत्रातील प्रा. दिलीप जगताप यांच्या कामगिरीची प्रशंसा केलेली आहे. यंदाच्या राज्यनाट्यस्पर्धेत प्रा. दिलीप जगताप यांची दहा नाटके सादर होत असल्याने त्यांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा नव्याने शिक्कामोर्तब झाले आहे. प्रा. जगताप यांच्या कामगिरीचे महाराष्ट्र भरातून तसेच सातारा जिल्हा व वाई तालुका परिसरातील रंगकर्मी कलाकारांतून कौतुक होत आहे.