कांबळे सरांनी शिष्यवृत्ती व बुद्धिमत्ता परीक्षेसाठी मार्गदर्शन पर लेखन करावे –डॉ. सुनील मगर
सातारा -शिष्यवृत्ती व बुद्धिमत्ता परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल असे लेखन कार्य आपण करावे ” अशी अपेक्षा वजा सूचना माजी शिक्षण संचालक डॉ. सुनील मगर यांनी श्री कांबळे गुरुजींना त्यांच्या” गणित गट्टी” या पुस्तकाच्या प्रकाशन व अमृत महोत्सवी सोहळ्याप्रसंगी केली.
सातारा जिल्ह्यातील अतित येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक (प्राथमिक) श्री. अरुण कांबळे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवी सोहळा तसेच त्यांच्या गणित गट्टी या पुस्तकाच्या प्रकाशनचा कार्यक्रम सातारा येथील लेक व्ह्यू मंगल कार्यालयात नुकताच पार पडला. पुस्तकाचे प्रकाशन माजी शिक्षण संचालक ( बाल भारती) डॉ. सुनील मगर यांचे हस्ते पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सातारा जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव होते. तर माजी शिक्षण उपसंचालक( पुणे) उदयसिंह भोसले, माजी सहाय्यक आयुक्त ( परीक्षा परिषदेचे) वाय. आर. निकम, माजी सहसंचालक ( एससीईआरटी ) राजेंद्र बाबर, माजी शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, माजी गटविकास अधिकारी श्यामराव शेडगे, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, माजी गटशिक्षणाधिकारी एन बी जाधव व प्रतिभा भराडे आदी प्रमुख उपस्थितीत होते.पाहुण्यांचे स्वागत व परिचय व प्रास्ताविक माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सत्यवान काटकर यांनी केले. त्यानंतर अतिथींच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागतगीत व इशस्तवन नवचैतन्य हास्य क्लब सदस्य वाकडचे श्री. राजेंद्र जोशी यांनी केले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यापूर्वी श्री. कांबळे सरांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांना ७५ दीपांनी सुहासिनी तर्फे ओवाळण्यात आले. शुभचिंतकांतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांची धान्य तुला करण्यात आली. या पूर्ण कार्यक्रमाचे संचलन श्री राजेंद्र जोशी यांनी केले त्यानंतर पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला सुरुवात झाली.
डॉ.सुनील मगर पुढे म्हणाले ” गणितासारखा अवघड विषय सोपा करून सांगण्याचे कसब श्री. कांबळे गुरुजी मधे आहे. हे कसब वापरून त्यांनी या पूस्तकात गणित हा विषय सोपा करून दाखविला आहे. याचा वापर जर शिक्षकांनी आपल्या शिकविण्यात केला, तर विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण होऊन ते पारंगत होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री. कांबळे गुरुजींना २००४ साली मिळालेल्या राष्ट्रपती पुरस्काराबाबत बोलताना माजी शिक्षण उपसंचालक उदयसिंह भोसले म्हणाले “पुरस्कारासाठी असलेले पूर्ण निकष पूर्ण करून कांबळे सर आपल्या कामामुळे या पुरस्कारासाठी पात्र ठरले आहे. आणि त्यामुळे पुरस्कारासाठी फार मोठा वशिला असावा लागतो हा समज त्यांनी खोटा ठरविला आहे. गुरुजींना मिळालेल्या राष्ट्रपती पुरस्काराचा आमच्या जिल्ह्यातील शिक्षकांनाच नव्हे तर पूर्ण जनतेला सार्थ अभिमान आहे. त्यांनी लिहिलेले व आज प्रकाशित करण्यात येत असलेले ” गणित गट्टी ” हे पुस्तक मेंदूला चालना देणारे आहे, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले कांबळे कुटुंब हे आदर्श व सुसंस्कारित कुटुंब असून यामधील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुरुजींनी केवळ सेवेतच नव्हे तर सेवानिवृत्तीनंतरही गेले 15 वर्षे स्वतःला पूर्णपणे झोकून काम करीत आहेत.त्यांच्या या वृत्तीमुळेच शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त अधिकाऱ्यांचे त्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.
याप्रसंगी गुरुजींचे मित्रपरिवारातील श्री. गुरव, राजेंद्र घोरपडे, नवचैतन्य हास्य ग्रुप वाकड चे श्री, दिलीप शेटे भालचंद्र ठोंबरे , डॉ. एम. जी.गुरव, कांबळे सरांची कन्या अनुपमा कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तर शशिकांत गायकवाड यांनी गणित गट्टीवर रचलेले उत्स्फूर्त कविता वाचन केले.
पुस्तक प्रकाशन सोहळा तसेच आपल्या अमृत महोत्सवी सोहळ्याला उत्तर देताना सत्कार मूर्ती कांबळे सर म्हणाले विद्यार्थ्यांच्या मनातील गणिता विषयीची भीती दूर करून त्यांना गणिताची गोडी लागावी हाच या पुस्तकाच्या निर्मिती मागील उद्देश” असल्याचे ते म्हणाले. आपल्या कामासाठी आपला मुलगा महेश यांने आपल्याला लॅपटॉप देऊन प्रशिक्षित केल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. आपल्या दोन्ही कार्यक्रमाच्या एकत्रित सोहळ्याला उपस्थितांचे त्यांनी आभार मानले. यानंतर कांबळे सरांची पुस्तक तुला करण्यात येऊन ही पुस्तके वितरित करण्यासाठी संबंधिताच्या स्वाधीन करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नवचैतन्य हास्य क्लब वाकडचे श्री. राजेंद्र जोशी यांनी तर पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे संचलन परिचय व स्वागत श्री. सत्यवान काटकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. शिवाजीराव कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला श्री. कांबळे गुरुजींचे आप्त, परीसरातील तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, नवचैतन्य हास्य ग्रुप चे संस्थापक श्री. रमेश राऊत श्री. एकनाथ पंडित व त्यांचे सहकारी तसेच असंख्य हितचिंतक उपस्थित होते.
