माऊली, माऊली” गजरात महाबळेश्वरच्या गिरिस्थान प्रशालेत बालवारकऱ्यांची दिंडी उत्साहात
महाबळेश्वर: “माऊली! माऊली!” च्या जयघोषात, टाळ-चिपळ्यांच्या निनादात आणि विठ्ठलनामाच्या भक्तिमय वातावरणात न्हालेली गिरिस्थान प्रशालेची बाल वारी आज (२ जुलै रोजी) उत्साहात पार पडली. पावसाळी सुट्ट्यांपूर्वी आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, शाळेच्या वतीने ही आनंदवारी आयोजित करण्यात आली होती.
या वारीचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध आकर्षक वेशभूषा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, विठ्ठल-रखुमाई आणि पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय बनवला होता. फुगडी आणि भजनांच्या जोडीने वारीला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली होती.
गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे प्राचार्य पी.आर. माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपशिक्षिका वैशाली पवार व उपशिक्षक अभिषेक साळुंखे यांनी वारीच्या यशस्वी संयोजनाची जबाबदारी सांभाळली. याशिवाय, उपशिक्षक हिम्मत औघडे, रोहिणी बगाडे, शोभा शिंदे, प्रशांत कानडे, मीनाक्षी पवार, कर्मचारी सुरेखा तांबे आणि पालक यांचाही या उपक्रमात मोलाचा सहभाग लाभला.
शाळेतून सुरू झालेली ही वारी मुख्य बाजारपेठ आणि मस्जिद रोड मार्गे पुन्हा शाळेत परतली. विशेष म्हणजे, पावसाच्या रिपरिप सुरू असतानाही विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहाने आणि भक्तिभावाने वारीत सहभाग घेतला. बाजारपेठेतील नागरिक आणि पर्यटकांनीही टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि या आनंदवारीचा मनमुराद आनंद लुटला.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती, भक्ती आणि वारकरी परंपरेची बीजे रोवणारा ठरला, असे समाधान पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केले.
