डॉक्टरांमुळे समाज सुरक्षित : विक्रमसिंह शिंदे
सातारा : डॉक्टर्स नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना अचूक आणि प्रभावी उपचार पुरवतात. या डॉक्टर्सच्या मेहनतीमुळेच आपण निरोगी आणि सुखी आयुष्य जगू शकतो. आपण सर्वांनी त्यांचा आदर करून, त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करूया, असे प्रतिपादन सातारा हॉस्पिटल आणि सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सीईओ विक्रमसिंह शिंदे यांनी केले.
सातारा डायग्नोस्टिक सेंटरच्या माधवबाग सेंटर मध्ये डॉक्टर्स डे निमित्त झालेल्या विजयोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी माधवबाग सेंटरच्या डॉ. देवकी पळणीटकर प्रमुख उपस्थित होत्या. हृदय रोगाशी संबंधित आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा यावेळी पुष्पगुच्छ व मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
विक्रमसिंह शिंदे म्हणाले, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आता अनेक गंभीर आजारांवर उपचार शक्य झाले आहेत. डॉक्टर हे समाजाचे आरोग्य रक्षक आहेत. ते केवळ आजार बरे करत नाहीत, तर आपल्याला निरोगी आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शन करतात. कोरोनासारख्या महामारीत डॉक्टर्सनी दाखवलेली तत्परता आणि त्याग हे आपल्यासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
माधवबाग सेंटर मधील उपचारांमुळे व्याधीतून बरे झालेल्या रुग्णांनी यावेळी मनोगते व्यक्त केली.
दरम्यान, सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स डे निमित्त झालेल्या छोटेखानी समारंभात हॉस्पिटल मधील डॉक्टर्सचा गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. सुहास जोशी, हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सौ जयश्री शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमसिंह शिंदे, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉ. दत्तात्रय मोरे, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. कपिल जगताप, मुख्य प्रशासन अधिकारी डॉ. निलेश साबळे तसेच हॉस्पिटल मधील डॉक्टर्स उपस्थित होते. हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी श्रीकांत देशमुख यांनी कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन केले.
