प्राचार्य शंकरराव उनउने राष्ट्रीय मराठी ,कोकणी बोलीभाषा काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर
झाडी बोली कवी उपेंद्र रोहनकर प्रथम, बेळगावी बोलीतील कवयित्री विजया देवगोजे द्वितीय, कोकणी बोलीतील अनिता बर्गे तृतीय
सातारा : येथील कर्मवीर भाऊराव विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने ऐतिहासिक ठरेल अशा राष्ट्रीय मराठी ,कोकणी भाषेतील बोलीभाषेतील काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर ,नोव्हेंबर २०२४ मध्ये केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निष्ठावंत अनुयायी, रयत शिक्षण संस्थेचे आजन्म सेवक, मराठीचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक व छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ज्यांनी ११ वर्षे प्राचार्यपद भूषविले असे प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउने यांच्या नावे ही स्पर्धा सुरु करण्यात आली. मराठी बोली व भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी बोली भाषा कविता लेखन स्पर्धेचे आयोजन असलेली ही देशातील पहिली स्पर्धा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून कवी कवयित्री मिळून १२३ जण सहभागी झाले असून १८६ कविता या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आल्या. या स्पर्धेचा निकाल मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी जाहीर केला. या स्पर्धेत गडचिरोली येथील उपेंद्र रोहनकर यांच्या झाडी बोलीतील ‘ डोरे राऊन आंद्रा’ या कवितेने प्रथम क्रमांक मिळविला असून रुपये ५००० चे पारितोषिक व सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक लांजा येथील कवयित्री मराठीचे अभ्यासक विजयालक्ष्मी देवगोजे यांच्या बेळगावी बोलीतील कविता ‘सासूरवाशीन’ या कवितेस जाहीर झाले आहे. रुपये चार हजार व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. अनिता नंदू बर्गे यांनी लिहिलेल्या ‘जीनेचे एक पुस्तक ‘ या कोकणी बोलीतील कवितेने तिसरा क्रमांक मिळविला असून तीन हजार रुपयांचे पारितोषिक रक्कम ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे. या स्पर्धेत बोलीभाषेतील कवितेला उत्तेजन देण्यासाठी आणखी रुपये ५०० ची १० विशेष पारितोषिके ठेवण्यात आलेली होती या उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवणाऱ्या कवींनी विविध बोलीतून सुंदर कविता लिहिल्या . यामध्ये उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक : सावंतवाडीचे कवी किशोर वालावलकर यांच्या कोकणी बोलीतीतील ‘ इस्माईल ठाकूर कुरले गरयता’ कवितेने मिळवला आहे .उत्तेजनार्थ दुसरा क्रमांक जळगाव येथील धरणगाव मधील कवी बी.एन .चौधरी यांच्या अहिराणी बोलीतील ‘अहिराणी म्हणी गोड ‘या कवितेस जाहीर झाला आहे. चंद्रपूर येथील आमडी येथील कवी ‘प्रशांत भंडारे’ यांच्या झाडी बोलीतील कविता ‘रोवणा’ हिस उत्तेजनार्थ तिसरा क्रमांक मिळाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील झाडी बोलीत कविता लिहिणारे कवी ‘ सुनील बावणे ‘यांच्या लाव बेकनी या कवितेने उत्तेजनार्थ चौथा क्रमांक मिळविला आहे. तर प्रा.भाऊसाहेब गोसावी यांच्या ‘निमो ‘या मालवणी बोलीतील कवितेने उत्तेजनार्थ पाचवा क्रमांक संपादन केला आहे. गोवा परिसरातील काणकोण परिसरातील कोकणी बोलीतील जयेश पाय्कर यांच्या ‘पोल्ली आणि चूल’ या कवितेने उत्तेनार्थ सहावा क्रमांक मिळविला आहे. तर सातारयाच्या ग्रामीण बोलीत लेखन करणारे लेखक ,कवी निलेश महिगावकर यांच्या ‘ पतंग्या’ या कवितेस उत्तेजनार्थ सातवे पारितोषिक जाहीर झाले आहे. मालवण येथील कवयित्री वैशाली पंडित यांच्या ‘ वाडा वो माय’ या घाटी बोलीतील कवितेने आठवे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले आहे. देवगड हिंदले येथील मालवणी कवी अविनाश बापट यांनी लिहिलेल्या ‘नामो कुळकार’ या मालवणी बोलीतील कवितेने उत्तेजनार्थ नववे पारितोषिक संपादन केले असून अंतिम दहावे उत्तेजनार्थ पारितोषिक लोकगीत बोलीत लिहिलेल्या ‘विलास चौगुले’ यांच्या ‘गोजरी भावज’ या कवितेस जाहीर झाले आहे. स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळविल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी कवींचे अभिनंदन केले. सदर काव्यस्पर्धेचे परीक्षक म्हणून शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख व बोलीभाषेचे अभ्यासक प्राध्यापक डॉ.नंदकुमार मोरे व डी.पी.भोसले कॉलेज कोरेगाव येथील मराठी विभागातील प्राध्यापक,काव्य समीक्षक प्रा.डॉ.देवानंद सोनटक्के यांनी काम केले . या स्पर्धेसाठी होणारा सर्व प्रकारचा खर्च भागवण्यासाठी प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब यांचे नातू अमोल अशोक उनउने व अमोल यांच्या पत्नी मीनल उनउने यांनी देणगी रूपाने देऊन सहकार्य केलेले आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या प्रत्येक कवीच्या एका कवितेस सहभागी करून व बोलीचा योग्य अभ्यास होण्याच्या दृष्टीने एकापेक्षा जास्त निवडलेल्या कवितांचा मिळून ‘ बोलीगंध’ हा प्रातिनिधिक कवितासंग्रह संपादक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे व सौ .मीनल अमोल उनउने हे संपादित करणार आहेत. जानेवारी २०२५ चे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पारितोषिक वितरण समारंभ घेण्याचे नियोजन असून या विशेष समारंभात प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येतील असे स्पर्धेचे समन्वयक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी सांगितले असून या कार्यक्रमास स्पर्धेतील व स्थानिक कवींनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.