मविआचा उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे
मुंबई :बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी (२४ ऑगस्ट) 2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र बंदच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात आज (२३ ऑगस्ट) सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असून राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही, असा निर्णय दिला.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी काय भूमिका घेणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात विविध ठिकाणी काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
महाविकास आघाडीच्यावतीने उद्या (२४ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं. यानंतर नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नाना पटोले म्हणाले, “उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा घेऊन आणि तोंडाला काळी पट्टी बांधून उद्या सकाळी ११ वाजता आंदोलन नाही मात्र आम्ही एकत्र बसणार आहोत. यासंदर्भातील सूचना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात दिलेल्या आहेत. आम्ही बंद करणार नाही, जनतेनं बंद केल्यास संबंध नाही”, असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.
