महाविकास आघाडीच्या घार्गे आणि टोळक्याने पुतना मावशीचे प्रेम आणू नये – माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर
सातारा : (प्रतिनिधी) माझ्यावर भारतीय जनता पक्षाने अन्याय केला आहे. असा खोटा प्रचार सोशल मीडियावर काही लोकांनी सुरू केला आहे. हा माझ्या कार्यकर्त्यांना जाणीव पूर्वक विचलीत करण्याचा प्रयत्न आहे. असा प्रकार करून त्यांनी माझ्याबद्दल पुतना मावशीचे प्रेम आणू नये असे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रा.बंडा गोडसे, माजी तालुका अध्यक्ष विकल्पशेठ शहा, रविंद्रशेठ काळे, शहर अध्यक्ष प्रदीप शेटे, श्रीकांत बनसोडे, जयवंत पाटील,मानसिंगराव देशमुख, जनार्दन देशमुख आदी उपस्थित होते.
डॉ. येळगावकर म्हणाले, आपण विद्यार्थी दशेपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होतो.नंतर सातारा येथे वास्तव्यास असताना सुरुवातीला जनसंघ भाजपाचे काम सुरू केले. खटाव तालुक्यात सुरुवातीला संघर्ष समितीच्या माध्यमातून काम सुरू केले.त्या काळात काही वेळा विधानसभा निवडणुकीत इतर उमेदवारांचा सक्रीय प्रचार केला.आपण १९९९ साली भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली .सातारा येथील घटनेमुळे थोडक्यात पराभव झाला. तो विसरून सतत पाच वर्षे पक्षाच्या माध्यमातून चांगले काम केल्याने २००४ साली मोठ्या झालेल्या विधानसभा निवडणूकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आलो .नंतरच्या काळात मतदार संघाचे विभाजन झाल्याने आपला पराभव झाला.त्यानंतर एका निवडणुकीत तत्कालीन मित्र पक्ष रासपचे उमेदवार शेखर गोरे व गत विधानसभा निवडणूकीत अपक्ष उमेदवारास पाठिंबा दिला.
तालुक्याचा शेतीपाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपण आमदार जयकुमार गोरे यांना समर्थन करीत आहोत.
मायणी भागात मोठी दहशत असताना आपण केशवराव पाटील यांची संघटना चालवली होती. राजकारणात अनेक पावसाळे पाहिले आहेत. आता पक्षाने आनंदाने काही दिले तर घेईन, नाही दिले तरी वाईट वाटणार नाही.
आपल्या बद्दल सोशल मीडियावर काही लोकांनी खोटा कळवळा आणला आहे. त्यामागचा हेतू शुद्ध नाही. खरेच प्रेम असेल तर त्यांनी मेळावा घ्यावा नाही तर निवडणूक झाल्यानंतर पक्ष श्रेष्ठींना भेटावे. आपले राजकीय हणन करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.