महाबळेश्वर अर्बन बँकेच्या अध्यक्ष पदी समीर सुतार तर उपाध्यक्ष पदी शरद बावळेकर यांची बिनविरोध निवड
महाबळेश्वर, 24 एप्रिल: महाबळेश्वर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी संचालक समीर सुतार आणि उपाध्यक्षपदी युवा संचालक शरद बावळेकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अनुराधा पंडितराव यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या समर्थकांनी निवडीचा आनंद मिठाई वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करून व्यक्त केला.
मागील महिन्यात बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी मतदान झाले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडण्यासाठी नवनिर्वाचित 13 संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काही संचालकांनी दोन गटात विभागणी झाल्याची बातमी समोर आली होती. यामुळे सभासदांमध्ये चुकीचा संदेश पोहोचण्याची शक्यता असल्याने सर्व संचालकांनी एकत्र बसून पदाधिकारी बिनविरोध निवडण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार आजच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी समीर सुतार आणि उपाध्यक्षपदासाठी शरद बावळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. एकमेव उमेदवार असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा पंडितराव यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली.
निवड जाहीर झाल्यावर सभागृहात उपस्थित असलेल्या संचालकांनी टाळ्यांच्या गजरात यांचे स्वागत केले.
सहाय्यक निबंधक अनुराधा पंडितराव आणि इतर अधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे स्वागत केले. यावेळी बँकेचे मावळते अध्यक्ष दत्ताजी वाडकर, माजी अध्यक्ष राजेश कुंभारदरे, जावेद वलगे, सीडी बावळेकर, सतीश ओंबळे, उषाताई ओंबळे, अनिल साळुंखे, नदीम शारवान, मनीषा पार्टे, प्रशांत कात्रट, संपत जाधव आणि बँकेचे मुख्य व्यवस्थापक फकीर वलगे उपस्थित होते.
मावळते अध्यक्ष दत्ताजी वाडकर यांनी बँकेची स्थिती उत्तम असल्याचे स्पष्ट करत नवीन पदाधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली. तसेच, एकदिलाने काम करून बँकेला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन दिले.
माजी अध्यक्ष राजेश कुंभारदरे यांनी अध्यक्ष म्हणून दत्ताजी वाडकर यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आणि समीर सुतार यांच्या नेतृत्वाखाली बँकेची चांगली प्रगती होईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष डीएम बावळेकर, माजी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, संदीप साळुंखे, रोहित ढेबे, तौफिक पटवेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.