नवीन शिक्षक भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवावी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे शिक्षण सभापतींना निवेदन
सातारा : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी कागदपत्र पडताळणी व समुपदेशन प्रक्रिया येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद सातारा येथे होणार आहे.
नवीन शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी जिल्ह्यातील बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. याबाबत समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात संवर्ग १ ते संवर्ग ४ अंतर्गत बदली प्रक्रिया राबविताना विस्थापित शिक्षक तसेच दुर्गम व अडचणीच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला शिक्षिकांचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नवीन शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी विद्यमान शिक्षकांच्या बदलीचा टप्पा राबविल्यास अनेक शिक्षकांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदलीची संधी मिळू शकते, असे समितीने निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस संतोष घोडके आणि जिल्हाध्यक्ष किरण यादव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.




