गणेशोत्सवापूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सुरू करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आग्रही मागणी
चाकरमान्यांची लूट थांबवण्यासाठी आंबेनळी घाटातून मुंबई, महाड बस सेवा पूर्ववत करण्याची प्रवाशांची हाक
महाबळेश्वर:गणेशोत्सवाच्या ऐन सणासुदीच्या काळात मुंबईहून कोकणात व आपल्या मूळ गावी येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय टाळण्यासाठी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा गणेशोत्सवापूर्वी तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाबळेश्वर शहराच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात महाबळेश्वर शहर शिवसेनेच्या प्रतिनिधीमंडळाने आगाराचे मुख्य व्यवस्थापक महेश जाधव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. तसेच महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन मस्के यांच्याशीही संपर्क साधून आंबेनळी घाटातून पोलादपूर आणि महाडकडे जाणाऱ्या एसटी बसेस गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी केली.
प्रवाशांची आर्थिक लूट व लांबचा प्रवास टळणार
सध्या आंबेनळी घाटातील वाहतुकीच्या प्रश्नामुळे महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता बंद किंवा मर्यादित असल्यास प्रवाशांना मुंबईहून पुण्यामार्गे मोठा वळसा घालून यावे लागते. यामुळे प्रवासाचा वेळ तर वाढतोच, शिवाय आर्थिक फटकाही सहन करावा लागतो. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन खाजगी वाहनधारक प्रवाशांकडून अवाजवी भाडे उकळून लूट करत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
जर सातारा जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्हा प्रशासनाशी तातडीने समन्वय साधून आंबेनळी घाटातून महाबळेश्वर-पोलादपूर, महाड व मुंबई एसटी बस सेवा पूर्ववत सुरू केली, तर चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि कमी खर्चाचा होईल. त्यामुळे प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ योग्य ती पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी सर्वसामान्य प्रवाशांमधून होत आहे.
या प्रसंगी एसटी आगारात निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, राजेश साळवी, युवा सेनेचे आकाश साळुंखे, अशोक मामा शिंदे, अमोल साळुंखे, मिथिलेश कानडे, राजू परदेशी आणि पत्रकार राजेश सोंडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




