‘किसन वीर’मध्ये ऊस तोडणी वाहतुक करारास प्रारंभ
दि. ७/६/२४ : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ या गळित हंगामासाठी कारखान्याकडे नोंदविलेल्या संपुर्ण ऊसाची तोडणी व वाहतुक वेळेत होण्याच्यादृष्टीने ऊस तोडणी वाहतुकीच्या कराराचा शुभारंभ कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या हस्ते ऊस तोडणी वाहतुक संस्थेचे अध्यक्ष बबनराव साबळे, उपाध्यक्ष अजय कदम व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर करण्यात आला.
सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतुक सोसायटीमार्फत कारखाना कार्यस्थळावर प्राथमिक स्वरूपात नितीन संपतराव कणसे, नारायण धोंडीबा कणसे, धनाजी यशवंत जाधव, ओंकार सुर्यकांत मोरे, दिपक जाधवराव, हणमंत आसबे, अविनाश सावंत, किरण सावंत, सुरेश घाटे, आदिनाथ सावंत, मनोहर कोकरे या ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदारांनी आपले करार केले.
व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यावेळी म्हणाले की, किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांच्या अथक प्रयत्नातुनच आपण किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखान्याचे गत दोन हंगाम सुरू करून यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. त्यामुळे कारखान्याची गेलेली पत निर्माण करण्यात यशस्वी झालेलो आहोत. मागील हंगामातील तोडणी वाहतुकदारांची फायनलची बीलेही आदा करण्यात आलेली आहेत. आमदार मकरंदआबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ हे पारदर्शी कारभार करीत असून कारखान्याला गतवैभव मिळणुन देण्याचे आबांचे स्वप्न आहे. आमदार मकरंदआबांनी पाहिलेले स्वप्न लवकरच सत्यात येणार असून त्यादृष्टीने आपण वाटचाल करीत असल्याचे सांगितले. आपल्या भागातील स्थानिक वाहतुकदार कंत्राटदारांच्याही आम्ही भेटी घेऊन त्यांचेही करार आपल्याकडे करण्यासाठी प्रयत्नशील असुन तेही आपल्याकडेच करार करतील असा विश्वासही व्यक्त करून येणार गळीत हंगाम पुर्ण क्षमतेने व सांघिक प्रयत्नातुन पार पाडण्याचे आवाहनही श्री. शिंदे यांनी यावेळी केले. तोडणी वाहतुक सोसायटीचे संचालक सुर्यकांत बर्गे यांनीही यावेळी आपले मनोगतामध्ये कारखान्याची परिस्थिती काय होती व आमदार मकरंदआबा पाटील व नितीनकाकांच्या नेतृत्वाखाली कारखान्याला नक्कीच सुगीचे दिवस येणार असल्याचे सांगितले.
यावेळी कारखान्याचे संचालक रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, तोडणी वाहतुक संस्थेचे संचालक मानसिंग साबळे, शिवाजीराव काळे, अरविंद कदम, नानासो कदम, चंद्रकांत फडतरे, शामराव गायकवाड, सुर्यकांत बर्गे, अॅड. उदयसिंह पिसाळ, मॅनेजर बी. आर. सावंत, शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, शामराव गायकवाड, अजय भोसले, ऊस वाहतुक कंत्राटदार बहुसंख्येने उपस्थित होते.