किसन वीर-खंडाळा कारखान्याचा बुधवारी बॉयलर प्रदिपन समारंभ
दि. १४/१०/२४ : म्हावशी, ता. खंडाळा येथील किसन वीर खंडाळा सहकारी साखर – उद्योगाच्या सन २०२४-२५ च्या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ बुधवार (दि.१६) सकाळी ११.३० वाजता वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे आमदार तथा किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मकरंदआबा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चनाताई मकरंद पाटील या उभयतांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती, किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मागील गळित हंगामातील एफआरपीसह सर्व देणी आपण दिलेली आहेत. कारखान्यातील अंतर्गत मशिनरींची कामेही पुर्ण झालेली असून आवश्यक तोडणी वाहतुक यंत्रणेचे करार पुर्ण झालेले आहेत. यंत्रणेचे तोडणी वाहतुक अॅडव्हान्सचे वाटप देखील करण्यात आले असून कारखाना गळीत हंगाम पुर्ण क्षमतेने करण्यास सुसज्ज आहे. कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बिगर सभासदांनी आपला परिपक्व झालेला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यास गाळपासाठी देण्यात यावा, असेही शेवटी पत्रकात म्हटले आहे.
या बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभास खंडाळा तालुक्यासह कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहन खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, किसन वीरचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, व्हाईस चेअरमन अनंत तांबे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.
