सातारा : शरद पवार, रामराजे यांना माझ्या मतदारसंघात पाणी आणता आले नाही. रात्रंदिवस परिश्रम करुन मी उरमोडी, तारळी, जिहेकठापूरचे पाणी आणल्याने तसेच टेंभू योजनेची कामे सुरु केल्याने बारामती, फलटणकरांचा अपमान झालाय. त्याचाच बदला घेण्यासाठी प्रभाकर घार्गेंना मोहरा करुन सगळे सुपारी बहाद्दर माझ्या विरोधात एक झाले आहेत. मी माझ्या मातीच्या आणि मायबाप जनतेच्या स्वाभिमानाची, दुष्काळमुक्तीची लढाई लढत असताना विरोधक मात्र मला रोखण्याचा एकमेव अजेंडा घेऊन जनतेचा विश्वासघात करत असल्याचे प्रतिपादन आ. जयकुमार गोरे यांनी केले.
मुंबई, ठाणे, रायगड स्थित माण – खटावकरांच्या कळंबोली येथे आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह माण खटावकर विक्रमी संख्येने उपस्थित होते.
आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, ज्या माण – खटावमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे तुळशी बारशीच्या लग्नालाही ऊस मिळत नव्हता तेथे आता चार चार साखरकारखाने सुरु आहेत. हजारो हेक्टरवर बागायती शेती होवू लागली आहे. दुष्काळमुक्तीच्या दिशेने जाणारा हा जलक्रांतीचा बदल मी विविध योजनांचे पाणी आणल्यामुळेच झाला आहे. जगाशी स्पर्धा करण्यासाठी आम्ही आता औद्योगिक क्रांतीचीही बीजे रोवली आहेत. दळणवळणाचे जाळे निर्माण केले आहे. गावोगावी कोट्यवधींची विकासकामे साकारली आहेत. टेंभू योजनेची कामे सुरु केली आहेत. प्रभाकर घार्गेंनी मतदारसंघात नेमके काय दिवे लावले आहेत ते जाहीरपणे सांगावे असे आव्हान आ. जयकुमार गोरे यांनी दिले.
बारामतीतून चावी मिळाल्याने चार्ज झालेले बिनकामाचे लाचार आणि तळवेचाटू निवडणूक संपत आली तरी व्यासपीठावर भांडत आहेत. माझ्याच कृपेने एकदा विधानपरिषदेचे आमदार झालेल्या आणि कोणत्याच पक्षात नसलेल्या घार्गेंसाठी आमचं ठरलयवाले जनतेप्रती बेगडी कळवळा दाखवत आहेत. घार्गेंना जनतेसाठी काहीच करायचे नाही. त्यांना जावयासाठी भविष्यातील वहिवाट तयार करायची असल्याने ते निवडणूक लढवत आहेत.
आ. गोरे पुढे म्हणाले, दुष्काळात पाण्याचे टॅंकर मागणारी माण – खटावची जनता आता ऊस तोडण्यासाठी टोळीची मागणी करु लागली आहे. हा बदल करण्यासाठी मला गेली १५ वर्षे अहोरात्र परिश्रम करावे लागले आहेत. हजारो कोटींचा निधी मिळवून पाणीयोजना पूर्ण कराव्या लागल्या आहेत. कोरोना काळात मी हजारो रुग्णांवर उपचार करुन त्यांचे जीव वाचवले आहेत. त्या सर्वांचे आशिर्वाद माझ्या पाठिशी आहेत. आमदारकीपेक्षा समाजाचे हित ध्यानात घेऊन मी अनेक अधिवेशनांमध्ये मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी केली आहे. माण – खटावमध्ये कधीच दुजाभाव न करता मी काम करत आलो आहे. विरोधकांकडे माझ्या विरोधात लढण्याचा एकही मुद्दा नाही. त्यांच्याकडे कोणताच अजेंडा नाही. माण – खटावची सूज्ञ मायबाप जनता आमचं ठरलयवाल्या टोळधाडीला नक्कीच घरी बसवणार आहे.
कळंबोलीत मुंबईकरांची विराट गर्दी अन जयकुमारांचा चौकार
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील माण – खटावकरांनी कळंबोलीच्या मेळाव्याला मोठी गर्दी करुन माणदेश आ. जयकुमार गोरेंच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले. व्यासपीठावर आ. गोरेंनी चौकार मारण्याची कृतीही केली. पाणी आल्याने दोन्ही तालुक्यात जलक्रांती होत आहे, आता एमआयडिसी होणार असल्याने रोजगारही उपलब्ध होणार आहेत. देवस्थाने रस्त्याने जोडली गेली आहेत. माण – खटावमध्ये बागायती शेती होवू लागली आहे. हे बदल आ. जयकुमार गोरे यांच्या अविरत परिश्रमाचेच फलित असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.