म्हसवडमधील एमआयडिसीचा समावेश प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेत होत असल्याने ते कामही वेगाने पूर्ण होणार-आ.जयकुमार गोरे
सातारा : प्रतिनिधी –परवा खटाव तालुक्यातील बाजारात आलेल्या कोल्ह्याला मी मतदारसंघात पाणी आणल्याचे माहित नाही. त्याने आणि घार्गेंच्या मुळावर उठलेल्या त्यांच्या बरोबरच्या टोळक्याने शंभूखेडमध्ये यावे. त्यांना जिहेकठापूर योजनेच्या पाण्यात बुडवून काढतो. बापाच्या जीवावर कॉंट्रॅक्टर झालेल्या नारळफोड्याने त्याच्या आवाक्याबाहेरचा बोराटवाडीचा विषयच घेवू नये. मी मायणीत येतो तेव्हा माझ्यासमोर उभे राहून दाखव असे आव्हान आ. जयकुमार गोरे यांनी सुरेंद्र गुदगे आणि ठरलयवाल्या टीमला दिले.
कलेढोण, वरकुटे मलवडी येथील जाहीर सभांमध्ये ते बोलत होते.
आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, माझ्या विरोधातील जनतेने नाकरलेले उमेदवार प्रभाकर घार्गे आणि आमचं ठरलयवाल्या टोळक्याला बारामती आणि फलटणमध्ये माझ्यामुळेच किंमत आहे. ते माझे विरोधक आहेत हाच त्यांचा चाटूगिरी करण्यातला प्लस पॉईंट आहे. आंधळी उपसा सिंचन योजनेचे पाणी उत्तर माणमधील ३२ गावांना सोडण्यात आले आहे. त्या पाण्याचे स्वागत करायचे सोडून आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करुन पाणी बंद करायला लावणाऱ्या घार्गे आणि कंपनीला जनता सोडणार नाही असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी दिला.
ठरलयवाल्यांना पत्रिका नाही, स्वागताला कुणी नाही तरीही त्यांची स्टेजवर चढायची घाई झाली आहे. मी गावागावांत विकासकामांचे बोर्ड लावले होते तेव्हा घार्गे आणि कंपनीने त्यांच्या कामांचे बोर्ड लावायची घाई केली नाही. घार्गेंच्या टीममधील प्रत्येकाचा ऊस जयकुमारने आणलेल्या पाण्यावरच भिजतो. कारखानाही त्या पाण्यावरच्या ऊसावरच चालतो. त्यांचे पाठिराखे पवार साहेब कितीही मोठे असले तरी त्यांनी आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवले हे खरे वास्तव आहे. मी माझ्या मातीच्या आणि जनतेच्या स्वाभिमानाची लढाई लढतो ते काय चुकीचे आहे का ? माझे विरोधक जाईल तिथे स्वाभिमान गहाण टाकून लाचार होवून चाटूगिरी करतात. खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणावरील वनविभागाची बंधने हटवून या धरणात विविध योजनांचे पाणी सोडण्याचे काम मी अंतिम टप्प्यात आणले आहे. म्हसवडमधील एमआयडिसीचा समावेश प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेत होत असल्याने ते कामही वेगाने पूर्ण होणार असल्याचे आ. गोरेंनी सांगितले. घार्गेंचा पक्ष कोणता ते आजही सांगू शकत नाहीत. पवारांवर निष्टा असल्याचे सांगणारे घार्गे लोकसभेवेळी भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, रासपकडे तिकीट मागायला हात पसरत गेले होते. आत्ताही ते त्यांचा पक्ष सांगू शकत नाहीत. त्यांना तुरुंगात असताना, दोन वेळा जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत, विधानपरिषदेच्या तसेच मार्केट कमिटीच्या निवडणूकीत मी मदत केली आहे. माझ्यावर बोलताना त्यांना लाज वाटली पाहिजे. माझ्या मतदारसंघात गोरगरीब शेतकऱ्यांच्या ऊसाचा काटा मारणारा कारखाना चालू देणार नाही असा इशाराही आ. गोरेंनी दिला.
