हिंदवी पब्लिक स्कूल मध्ये पंचकोशात्मक विकसन शिक्षणाचा शुभारंभ
साताऱ्यातील अग्रगण्य शिक्षणसंस्था हिंदवी पब्लिक स्कूल व शैक्षणिक प्रयोगात अग्रस्थानी असलेली ज्ञान प्रबोधिनी निगडी पुणे हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रकल्पाअंतर्गत आगामी शैक्षणिक वर्षापासून करारबद्ध झाले.
भारत हा प्राचीन कालापासून संपूर्ण जगाला ज्ञान देणारा मुख्य स्त्रोत राहिलेला आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये ‘विद्यार्थ्यांच्या पंचकोशात्मक विकासासाठी विविध उपक्रमांद्वारे शिक्षण’ ही संकल्पना हजारो वर्ष कार्यान्वित होती. या संकल्पनेचे पुनरुत्थान प्रदीर्घ अभ्यासातून ज्ञानप्रबोधिनी निगडी पुणे यांनी पुनरुज्जीवित केले व अनेक वर्षांच्या शैक्षणिक तपश्चर्येतून पुन्हा यशस्वीपणे प्रस्थापित केली आहे. विद्यार्थ्यांच्या पंचकोशात्मक विकासाद्वारे बहुआयामी व्यक्तिमत्व घडवणे हे या शिक्षण पद्धतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
याप्रसंगी बोलताना ज्ञानप्रबोधिनीच्या गुरुकुल प्रकल्पाचे प्रमुख श्री आदित्य शिंदे म्हणाले की गेली अनेक वर्ष ज्ञान प्रबोधिनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजास आदर्श नागरिक देत आहे. हिंदवी पब्लिक स्कूल प्रयत्नपूर्वक गुरुकुल उपक्रम यशस्वी करेल असा विश्वास आहे.
ज्ञान प्रबोधिनी निगडीचे विश्वस्त श्री प्रशांत दिवेकर याप्रसंगी बोलताना म्हणाले की शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. प्रगत व प्रगल्भ शिक्षक उत्कृष्ठ विद्यार्थी घडवू शकतात. शिक्षकांच्या उद्भोधनाद्वारे पंचकोशात्मक विकासाच्या उपक्रमास यशस्विता लाभेल अशी आशा व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी यांनी ज्ञानप्रबोधिनी पुणे ने हिंदवी पब्लिक स्कूल वर विश्वास व्यक्त केला याबद्दल समाधान व्यक्त केले. हिंदवी पब्लिक स्कूल ही पुणे वगळता पश्चिम महाराष्ट्रातील पंचकोशात्मक शिक्षणाचा प्रयोग करणारी पहिली व एकमेव संस्था आहे. ही संधी ज्ञानप्रबोधिनीने उपलब्ध करून दिली त्याबद्दल संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली व हिंदवी पब्लिक स्कूल हा विश्वास यशस्वी करून दाखवेल असा निर्धार व्यक्त केला. या ऊपक्रमात प्रवेश घेऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री अशोकराव कुलकर्णी, ज्ञानप्रबोधिनीचे श्री शुभम गायकवाड, हिंदवी – गुरुकुल प्रकल्पाच्या संचालिका सौ. रमणी कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख श्री. संदीप जाधव, हिंदवी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा बारटक्के, उपमुख्याध्यापिका सौ शिल्पा पाटील, सौ. अश्विनी तांबोळी, श्री. प्रसाद जोशी, श्रीमती हेमलता जगताप, शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.