हिंदवीत भरली विठ्ठल नामाची शाळा
सातारा, ता. १७ ः आषाढी एकादशीनिमित्त श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेपासून शाहूपुरीत चौकापर्यंत विठ्ठलाच्या मुर्तीसह वृक्षाचीही पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. बाल वारकऱ्यांसोबत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह पालकही सहभागी होत फुगड्या खेळून दिंडीचा आनंद लुटला.
वारकरी संप्रदायाची टाळ दिंडी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख आहे. हा अनमोल ठेवा पुढील पिढीने ही जतन करावा या हेतूने पालक बालगोपाळांचा टाळ दिंडी सोहळा एकादशीच्या आदल्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने दिंडीस प्रारंभ करण्यात आला. दिंडीत सहभागी होतांना ‘राम कृष्ण हरी, ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ अशा नामघोषात शाळकरी विद्यार्थी व गावकरी रमून गेले. तर श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची टाळ गजरात मिरवणूक काढण्यात आली.
विठ्ठलाची वेशभूषा इयत्ता पहिलीतील शान भाऊसाहेब माळी याने तर रुक्मिणीची वेशभूषा इयत्ता दुसरीतील मालू सुधाकर सोनवणे या विद्यार्थ्यांनी साकारली. दिंडीत सहभागी होत डोक्यावर तुळशी घेणाऱ्या शाळकरी मुली, झेंडेकरी, विणेकरी यामुळे सर्व गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. दिंडीसाठी रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. दिंडी पुन्हा शाळेत आल्यानंतर प्रवचनकार सुधाकर मोरे यांनी मनोरंजनात्मक पद्धतीने गोष्टी सांगून विठ्ठलाची महती व आषाढी एकादशीचे महत्व विशद केले. कार्यक्रमास श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, सचिव नानासाहेब कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, पंचकोषाधारित गुरुकुल प्रकल्पाच्या संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापक मंजुषा बारटक्के, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, शिक्षक व पालक उपस्थित होते.