मतदानासाठी ‘हिंदवी’च्या विद्यार्थ्यांनी लिहिली पत्रे
माझ्या भविष्यासाठी मतदान करण्याचे आवाहन
सातारा, ता. १० : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी हिंदवी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्र लिहले आहे. ‘माझ्या भविष्यासाठी मतदान करा,’ असा संदेश देत शाळांमधून उपक्रम राबविण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेच्या माध्यमातून अनेकविध उपक्रम राबविण्यात आले. पालक आपल्या मुलांचा हट्ट पुरवितात, किंबहुना मुलांच्या इच्छेला प्रतिसाद देतील आणि पालक मतदान केंद्रांवर जातील, त्यातून मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, या अपेक्षेने सदर उपक्रम हिंदवी पब्लिक स्कूलने राबविला. या उपक्रमासाठी चांगला प्रतिसाद मिळाला.
या मोहिमेत विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पेतून पालकांना मतदानासाठी साद घातली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना अशाप्रकारचे पत्र लिहिले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने पालकांना पत्रे दिली आहेत. याचा सकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता असल्याचा विश्वास श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेली सुमारे ५० ते ६० पत्रे अतिशय आशयपूर्ण आणि औचित्याला अनुरूप, अशी लिहिली असल्याने मुलांच्या कल्पनाशक्तीतून अनेक उपाययोजनादेखील यातून समोर आली आहे. सदर मोहीम सुरू करताना प्रारंभी शाळेतून विद्यार्थ्यांनी लिहिलेले पत्र हे टपालाच्या माध्यमातून पालकांना धाडण्याची योजना आखण्यात आली आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांनी पालकांकडे पत्रे सुपूर्द केली.