कार्यकर्त्याच्या मोबाईल स्टेटसवरून घमासान
सातारा – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सर्व ठिकाणी सुरू असून महायुतीचे उमेदवार महेश शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे प्रचारात व्यस्त आहेत. दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे यांच्याबाबत एका युवकाने आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियाच्या स्टेटसवर ठेवल्याच्या कारणावरून या मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.
या प्रकरणात संबंधित युवकावर महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये बोलवून पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आ.शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला आहे. पुसेगाव पोलीस ठाण्यासमोर शेकडो कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आ.शशिकांत शिंदे यांनी ठिय्या आंदोलन केले. संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जोपर्यंत निलंबित करत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही, अशी भूमिका शशिकांत शिंदे आणि कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे पुसेगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शांत समजल्या जाणाऱ्या कोरेगाव खटाव विधानसभा निवडणुकिस गालबोट लागत आहे.