महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत
सातारा -प्रतिनिधी ग्रामपंचायतीला विकास कामे करण्यासाठी ग्राम निधी, वित्त आयोगाचा निधी अपुरा पडतो. जिल्ह्यातील महिला सरपंचांना याबाबत प्रोत्साहन देण्यासाठी नाम फाऊंडेशन, दीपस्तंभ फाऊंडेशन,परांजपे ग्रुप लोकसहभागातून विकास कामास सीएसआर फंडातून शक्य ती मदत करु शकतात.यासाठी शुक्रवार दि.१७ में रोजी दु.१२ वाजता वर्ये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात बैठक होणार असून जिल्ह्यातील महिला सरपंचांनी यावेळी उपस्थित रहावे ,असे आवाहन पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांनी केले आहे.
या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख,नाम फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात, दीपस्तंभ फाऊंडेशनचे अध्यक्ष अमेय जोशी, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले,नाम फाऊंडेशन पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब शिंदे,परांजपे ग्रुपचे शिरीष पवार, केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.बी. एस.सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील महिला सरपंचांना गावात जलसंधारण, शिक्षण,ग्राम विकास याबाबत लोक सहभागातून होणाऱ्या कामांना सीएसआर फंडातून प्रोत्साहन म्हणून मदतीसाठी हि बैठक आयोजित करण्यात आली आहे.
यात गावातील सीएसआर फंडातून कोणती कामे करता येतील, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रस्ताव कसा करावा, लोकसहभाग कसा अपेक्षित आहे, कामे कशी करावी लागणार आदी माहिती मान्यवर देऊन शंका निरसन करणार आहेत.
जिल्ह्यातील प्रथमच रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्राने पुढाकार घेऊन हा स्तुत्य उपक्रम आयोजित केला आहे. यामुळे लोकसहभागातून विकास कामे करण्यासाठी आता सीएसआर फंडाची मदत होणार असल्याचे प्राचार्य विजय जाधव यांनी सांगितले.