शिक्षण विभाग पंचायत समिती महाबळेश्वर येथील शिक्षक व केंद्रप्रमुखांनी केला ‘हिवाळी’ शाळेचा अभ्यास दौरा
संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना आपल्या अनोख्या गुणवत्तेच्या जोरावर आकर्षित करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ‘हिवाळी’ ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक या शाळेस शिक्षण विभाग पंचायत समिती महाबळेश्वर येथील ६० शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी नुकतीच भेट दिली.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीम.याशनी नागराजन तसेच प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मा.श्रीम.शबनम मुजावर यांचे मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षक व केंद्रप्रमुख यांचा संयुक्तिक अभ्यास दौरा आयोजित करणेत आला होता..
‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी’ ही शाळा आदिवासी पाड्यावरील शाळा असून या शाळेच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहेत, वर्षभरात ३६५ दिवस चालणारी ही शाळा असून दररोज १२ घड्याळी तासांचे केले जाणारे प्रभावी अध्ययन-अध्यापन, गावचा मूळ पट जेम-तेम १० असताना पंचक्रोशीतील ५५ विद्यार्थी शिक्षणासाठी या शाळेत येतात, त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे एकच शिक्षक असून त्यांनी विद्यार्थ्यांची केलेली शैक्षणिक तयारी खूपच वाखाणण्याजोगी आहे, लोकसहभागाच्या माध्यमातून शिक्षकांनी उभी केलेली अप्रतिम अशी हायटेक शिक्षण देणारी अत्याधुनिक इमारत, गटनिहाय वर्गाध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्याची केलेली अत्युत्तम प्रगती, उत्कृष्ट परसबागेतून उत्पादित केला जाणारा भाजीपाला व फळभाज्या, कौशल्याधिष्ठित शिक्षणावर दिलेला भर, तीन शतकापर्यंतचे पाढे पाठांतर, दोन्हीही हातांनी लेखन करणारे विद्यार्थी, केवळ लेखन-वाचनावर समाधान न मानता आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिले जाणारे शिक्षण..अशा कितीतरी वैशिष्ट्यपूर्ण बाबींच्या माध्यमातून शाळेची झालेली जडण-घडण पाहिल्यानंतर तेथील शिक्षक श्री.केशव गावीत यांचे कार्य कौतुकास्पद आहे, याची प्रचिती येते अशी माहिती महाबळेश्वरचे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी दिली.हिवाळी शाळेच्या कार्यातून प्रेरणा घेवून महाबळेश्वर तालुक्यातील शाळांसुद्धा प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न सर्व शिक्षक व केंद्रप्रमुख यांनी करावा, असा आशावाद गटविकास अधिकारी यशवंत भांड यांनी व्यक्त केला..
सदर अभ्यास दौऱ्याच्या यशस्वितेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी एन.के.धनावडे, केंद्रप्रमुख संजय पारठे, दगडू ढेबे, नामदेव धनावडे, चंद्रकांत जंगम, विनायक पवार, आनंदा सपकाळ, तसेच शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र भिलारे, शिक्षक बॅन्केचे संचालक संजय सपकाळ यांनी विशेष परिश्रम केले.