डॉ.विवेक देशमुखांचा भाजपमध्ये प्रवेश कुरोली गण, औंध गटातील समीकरणे बदलली
सातारा : कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष, पं.स. सदस्य डॉ. विवेक देशमुख यांनी सहकाऱ्यांसह आ. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाने खटाव महाविकास आघाडीला खिंडार पडून कुरोली गणाची आणि औंध जिल्हा परिषद गटाची समीकरणे बदलली आहेत.
सिध्देश्वर कुरोली गणावर मजबूत पकड असलेले डॉ. विवेक देशमुख पूर्वाश्रमीचे आ. जयकुमार गोरे यांचेच समर्थक होते. आ. गोरे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये फारकत झाली होती. औंधसह २१ गावांचा पाणीप्रश्न आ. जयकुमार यांच्याच माध्यमातून सुटणार असल्याने तसेच नेर धरण उजवा आणि डाव्या कालव्याच्या पुनरुज्जीवनाचे कामही त्यांच्याच माध्यमातून मार्गी लागणार असल्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
डॉ. देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने खटाव तालुका महाविकास आघाडीला खिंडार पडले आहे. कुरोली गण आणि औंध गटाची राजकीय समीकरणे बदलून महायुतीची ताकद वाढली आहे. डॉ. देशमुख यांच्यासह हनुमंत हिरवे, शहाजी देशमुख,भरत जाधव,निलेश जाधव,संतोष भंडारे,हरिभाऊ बनसोडे,अमरजीत देशमुख,कांतीलाल देशमुख, रमेश देशमुख,सुजीत ननावरे,विठ्ठल देशमुख,मंगेश शिंदे,केतन देशमुख यांनी आ. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.