वेळ लागला तरी चालेल, पण कट प्रॅक्टिस नको : डॉ. मन्मथ राऊत गिरिजाच्या आर्थोपेडिक विभागाचा शुभारंभ
सातारा प्रतिनिधी : वैद्यकीय व्यवसायात अनेक आमिषे आहेत. त्यामुळे व्यवसायातील माणुसकी जपून रुग्णसेवा करण्याबरोबरच यशस्वी होण्यासाठी वेळ लागला तरी चालेल, पण कट प्रॅक्टिस नको, असा सल्ला सोलापूर येथील ज्येष्ठ आर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. मन्मथ राऊत यांनी दिला. येथील प्रसिद्ध गिरिजा हॉस्पिटलच्या आर्थोपेडिक विभागाचा तसेच मल्टिस्पेशालिटी विभाग व जनरल वॉर्ड शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे होते. यावेळी ज्येष्ठ आर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. विलास माने, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. युवराज खाडे, डॉ. मुरलीधर वारुंजीकर, डॉ. शरद जगताप, डॉ. सुनील यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. मन्मथ राऊत यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या अस्थिरोग व्यवसायातील अनुभव कथन करुन मार्गदर्शन केले. तसेच ताज्या दमाचे डॉ. रोहित यादव यांनी गिरिजा हॉस्पिटलची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतली आहे. माया, ममता, किफायतशीर दराची परंपरा यापुढेही डॉ. रोहित सुरु ठेवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. युवराज करपे यांनी आपल्या भाषणात गिरिजा हॉस्पिटलने अशीच यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, असे सांगताना आपल्याकडून लागेल ते सहकार्य करु, अशी ग्वाही दिली.
डॉ. मुरलीधर वारुंजीकर यांनी आपल्या दिलखुलास शैलीत मार्गदर्शन करुन गिरिजा हॉस्पिटलचा समाजाला नक्कीच उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. माने यांनी कोणत्याही रुग्णाला सहजपणे न घेता त्याला गंभीरपणे तपासून त्याला आजारातून मुक्त करण्याचे कार्य करावे, असा मौलिक सल्ला दिला. इंडियन मेडिकल असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष डॉ. शरद जगताप यांनीही शुभेच्छा दिल्या. डॉ. सुनील यादव यांनी सर्वांचा परिचय करुन देऊन स्वागत केले. गिरिजा आर्थोपेडिक विभागाचे संचालक डॉ. रोहित यादव यांनी प्रास्तविक केले. डॉ. सुनील यादव यांनी प्रतिकूल परिस्थितीत लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाल्याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच हॉस्पिटल मधील सुरु होत असलेला अस्थिरोग विभाग आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या सांधेरोपण, दुर्बिणीतील शस्त्रकिया, अवघड फॅक्चर्स यांचे उपचार माफक दरात उपलब्ध करुन देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या सर्व प्रवासात आई-वडिलांसोबत पत्नी डॉ. अश्विनी यांची साथ लाभल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
प्रा. संध्या चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अश्विनी यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. सुनंदा यादव, दीपलक्ष्मी नाईक, सुभाष कदम, धनंजय चव्हाण, डॉ. दीपक थोरात, अविनाश काटकर यांच्यासह शहरातील असंख्य मान्यवर, हितचिंतक उपस्थित होते.