धोम बलकवडी प्रकल्पातून टंचाई आवर्तन पाणी सोडा..
खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी , आमदार मकरंद पाटील यांना साकडे
खंडाळा : शासनाने खंडाळा तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केलेला आहे तसेच या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दिवसेंदिवस उन्हाळी परिस्थितीमुळे तो आणखीनच गंभीर होत चालला आहे. या परिस्थितीमुळे तालुक्यात भीषण टंचाई जाणवत आहे. त्यामुळे धोम बलकवडीच्या टंचाई आवर्तनातून खंडाळ्याला पाणी सोडावे अशी मागणी खंडाळकरांनी केली आहे.
खंडाळा तालुक्यतील भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन सरपंच परिषदेचे अध्यक्ष गणेश धायगुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार मकरंद पाटील यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली यावेळी राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अजय भोसले , बाजार समितीचे संचालक भगवान धायगुडे , महेश राऊत , दत्तूनाना धायगुडे , बापूराव धायगुडे, बंडू शिंदे , यासह शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
खंडाळा तालुक्यात यावर्षी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. खंडाळा शहरासह अनेक गावातून आणि वाडीवस्तीतून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. खंडाळा शहरात तर नळाने पाणीपुरवठा पूर्णतः बंद आहे. इतर गावातून दिवसाआड पिण्याचे पाणी तेही गरजेपुरतेच मिळत आहे. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्यांची फरफट होत आहे. माणसांसह जनावरांच्या चार्याचा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत धोम बलकवडीचे एक टंचाई आवर्तन खंडाळा तालुक्यासाठी सोडले तर किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता तरी मार्गी लागू शकतो. त्यामुळे हे आवर्तन तातडीने सोडावे यासाठी आमदार मकरंद पाटील यांची भेट घेऊन लोकांनी साकडे घातले.