वृक्षारोपनाने देऊर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा बिचुकलेत स्वातंत्र्यदिन साजरा
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, उन्नत भारत अभियान, राष्ट्रीय छात्र सेना आणि बिचुकले ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने बिचुकले गावात ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण आणि प्लास्टिक संकलन या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
७८ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जनजागृतीचा जागर करत फक्त घोषणा देऊन नाही तर हा स्वातंत्र्यदिन कृतीयुक्त स्वातंत्र्यदिन साजरा करायचा असा निश्चय करून प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयातील रा.सो.यो.च्या व रा.छा.से. विद्यार्थ्यांनी बिचुकले या महाविद्यालयाच्या दत्तक खेडेगावात जाऊन वृक्षारोपण तसेच प्लास्टिक संकलन केले. प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम, त्याचा पर्यावरण तसेच मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन महाविद्यालयाने प्लास्टिकचे उच्चाटन करणे तसेच पर्यावरणीय समतोल साधण्याच्या दृष्टीने झाडांचे सध्याच्या काळातील महत्व लक्षात घेऊन वृक्षारोपण करणे अशा दुहेरी उद्देशाने या जनजागृतीपर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयातील स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहन झाल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांनी बिचुकले गावातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ च्या घोषणा देत प्रथम प्रबोधनपर फेरी काढून त्यानंतर स्मशानभूमी परिसरात २५ झाडांची लागण करण्यात आली तसेच वृक्षारोपण झाल्यानंतर या परिसरातील प्लास्टिक गोळा करत या महाविद्यालयाने या दिवसाच्या निमित्ताने एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला. प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बिचुकले गावातील स्मशानभूमी परिसरात ही वृक्षारोपण आणि प्लास्टिक निर्मूलनाची मोहीम दोन प्राध्यापकांच्या समवेत जवळपास दोन तास काम करत राबविली.
या जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कमलसिंग क्षत्रिय आणि सहा. प्रा. सूर्यकांत अदाटे यांनी केले होते. या जनजागृती कार्यक्रमासाठी बिचुकले गावचे सरपंच श्री. प्रशांत पवार आणि उपसरपंच श्री.सिद्धेश पवार, श्री.सुशील शिंदे आणि श्री.महादेव पवार यांचे सहकार्य लाभले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ तसेच वृक्षतोड न करण्याची आणि लावलेली झाडे जगविण्याची शपथ घेतली. यावेळी आठवड्यातून एकदा जाऊन वृक्षसंगोपन करण्याचे आणि पाणी घालण्याचे वचन ग्रामस्थांना दिले. यावेळी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. शिवाजी चवरे यांनी बिचुकले या महाविद्यालयाच्या दत्तक खेड्यापासून वृक्षारोपण आणि प्लास्टिक निर्मुलन अशा जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात झाली असून देऊर महाविद्यालय अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य देत असते, हे सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.शिवाजी चवरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.कमलसिंग क्षत्रिय, सहा.प्रा. सुर्यकांत अदाटे, बिचुकले गावचे सरपंच श्री. प्रशांत पवार आणि उपसरपंच श्री.सिद्धेश पवार, श्री.सुशील शिंदे आणि श्री.महादेव पवार महाविद्यालय रा.से.यो. विद्यार्थी प्रतिनिधी प्रतिनिधी श्री. ओम भोईटे तसेच महाविद्यालयातील रा.से.यो. व रा.छा.से. स्वयंसेवक तसेच यावेळी बिचुकले गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
