वाई अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम
वाई, दि. 19 – दि वाई अर्बन को. आँप. बँकेचा वर्धापन दिन शुक्रवार, दि. 21 जून, 2024 रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सदर दिवशी बँकेत सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत श्री सत्यनारायण पूजा व बँकेचे सभासद व ग्राहकांसाठी चहा-पान कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे शनिवार, दि. 22 रोजी बँकेच्या प्रधान कार्यालयात सकाळी 9 ते 2 या वेळेत रक्तदान शिबीर, तसेच रविवार, दि. 23 रोजी सकाळी 9 वाजता वेळे येथील करूणा मंदिर परिसरांत 103 वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अनिल मोरेश्वर देव, उपाध्यक्ष डाँ. शेखर बाळकृष्ण कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी व संचालक सदस्यांनी दिली.
अध्यक्ष श्री. अनिल देव म्हणाले की, बँकेच्या 103 व्या वर्धापन दिनी आपल्या अध्यक्षतेखालील नवीन संचालक मंडळाच्या कामकाजाची वर्षपूर्तीही होत आहे. त्याचा आनंद व बँकेचा वर्धापन दिन साजरा करताना विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले आहेत. रक्तदान हे महान दान समजले जाते. अनेक रूग्णांना रक्ताची सतत गरज लागत असते. रक्तदान शिबिराच्या माध्यमांतून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. सध्या जगाला ग्लोबल वाँर्मिंगसारख्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सततची उष्णता वाढ थांबविण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. याचा विचार करून 103 झाडे लावण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. त्याची सुरूवात रविवारी सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे.
मागील काही वर्षात बँकेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार व हितचिंतक यांच्या माध्यमांतून बँक कठीण प्रसंगातून बाहेर पडत आहे. याचा आनंद आहेच. बँकेपुढे असलेल्या आव्हानांची जाणीव बँकेचे संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाला असून त्यादृष्टीने उपाययोजना सुरू आहेत. बँकेच्या कठीण कालावधीमध्ये बँकेचे ठेवीदार, सभासद, हितचिंतक व ग्राहक यांनी बँकेवर जो विश्वास दाखवला. त्याची परतफेड होऊ शकणार नाही. ग्राहकांचा अखंड विश्वास सार्थ ठरविण्याचे काम बँकेचे संचालक मंडळ व कर्मचारी पूर्ण शक्तीनिशी करीत आहेत, याची खात्री बँकेचे सभासद व ठेवीदार यांनी बाळगावी, असे आवाहनही श्री. अनिल देव यांनी केले आहे.
वर्धापन दिनानिमित्ताने वरील सर्व कार्यक्रमांस ग्राहकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवावा. बँकेच्या वाई शाखेत बँकेचे सभासद व ग्राहकांनी तीर्थप्रसाद व अल्पोपहार कार्यक्रमास शुक्रवारी सकाळी 10 ते 4 या वेळेत उपस्थित राहून बँकेवरील आपले प्रेम वृध्दींगत करावे. शनिवारी सकाळी 9 ते 2 या वेळेत बँकेत रक्तदान शिबीर व रविवारी सकाळी 9 वाजता वृक्षारोपण कार्यक्रमास वेळे येथील करूणा मंदिर परिसरांत उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेच्या संचालक मंडळाने केले आहे.