वाई अर्बन बँकेच्या वाहन कर्ज योजनेचा फायदा घ्यावा- अनिल देव
वाई, दि. 11 – दि वाई अर्बन को. आँप. बँकेने ग्राहकांसाठी साडेनऊ टक्के इतक्या व्याजदरांत सुरू ठेवलेल्या वैयक्तिक वाहन कर्ज योजनेचा फायदा घेऊन आपले चारचाकी खरेदीचे स्वप्न साकार करावे तसेच बँकेने माफक व्याजदरात सुरू ठेवलेल्या विविध प्रकारच्या कर्ज योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनी केले.
बँकेच्या सोनगीरवाडी शाखेच्यावतीने आयोजित वाहन वितरण कार्यक्रमात अनिल देव बोलत होते. याप्रसंगी बँकेचे संचालक व मान्यवर खातेदार उपस्थित होते. बँकेचे उपाध्यक्ष डाँ. शेखर कांबळे म्हणाले, बँकेने नेहमीच छोटे व्यावसायिक, व्यापारी व उद्योजक यांच्या साठी साडेनऊ टक्के व्याजदराने वाहन कर्ज, साडेअकरा टक्के व्याजदराने व्यावसायिक वाहन कर्ज, तेरा टक्के दराने कॅश क्रेडीट व स्थावर मालमत्ता तारण मुदत कर्ज उपलब्ध करून दिले आहे. सोनेतारण कर्जासाठी सव्वा नऊ टक्के इतका कमी व्याजदर ठेवला आहे. घरबांधणी कर्जावरील कर्जाचा व्याजदर देखील बँकेने कमी केलेला असून पूर्वीपेक्षा कमी व्याजदरात बंगला बांधणे, नवीन घर खरेदी करणे, नवीन फ्लॅट खरेदी करणे या कामांसाठी दहा टक्के व्याजदराने घरबांधणी कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे. बँकेवरील जिव्हाळ्याप्रती बँकेच्या कर्ज व ठेव योजनेला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांनी नवीन कमी केलेल्या व्याजदराच्या कर्ज योजनांचा फायदा घेऊन आपले जीवनमान उंचवावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी उद्योजक संतोष अंबवले यांना टोयाटो हाय राईडर या गाडीसाठी देण्यात आलेल्या वाहन कर्ज वितरणांतर्गत वाहनाच्या चाव्या देण्यात आल्या. याप्रसंगी बँकेचे संचालक काशीनाथ शेलार, मकरंद मुळ्ये, अशोक लोखंडे, प्रीतम भुतकर, संचालिका सौ. ज्योती गांधी, उद्योजक सुनील संकपाळ आदी उपस्थित होते. शाखाधिकारी सारंग बाचल, हेमराज नवले व शाखेतील कर्मचा-यांनी उपस्थितांचे स्वागत केले.