अखेर बस थांबा झाला
सातारा -प्रतिनिधी वडूथ परिसरातील नागरिकांसाठी सुविधा सुसज्ज असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हा आधार केंद्र बनले आहे. मात्र येथे एसटी थांबा नसल्याने रुग्णांची होणारी गैरसोय होत असताना मागणी करुनही महामंडळाचे अधिकारी दाद देत नव्हते.अखेर भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळे यांनी महामंडळाला वास्तव आणि थांबा होण्याची गरज निदर्शनास आणणारे निवेदन दिले.याची दखल घेऊन अखेर महामंडळाच्या विभागीय नियंत्रकानी प्राथमिक आरोग्य केंद्र वडूथ येथे एसटी बस थांब्याला मान्यता देत या परिसरातील ये जा करणाऱ्या एसटी चालक वाहकांना तसे आदेश दिले.
सातारा रोड , भक्तवडी,भाडळे, किन्हई परिसरातील रुग्णांसाठी वडूथ येथील सुविधायुक्त असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र वरदान ठरत आहे. मात्र या ठिकाणी एसटी थांबा नसल्याने रुग्णांना नाहक त्रास होत असल्याचे अनेकांनी लोकप्रतिनिधी, महामंडळाचे अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले तरीही दखल घेतली जात नव्हती. याबाबत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळे यांनी निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा केला.
यावर विभागीय नियंत्रकांनी वास्तव परिस्थिती समजून घेऊन सदरची मागणी रास्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दि.२६ जून पासून प्राथमिक आरोग्य केंद्र, वडूथ हा एसटी गाड्यांसाठी संगणक प्रणालीवर थांबा घेऊन तशा चालक वाहकांना आदेश आणि सुचना दिल्या.
या थांब्यासाठी मदन साबळे यांचे प्रयत्न अखेर यशस्वी झाले परिसरातून समाधान व्यक्त केले.