वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)आढाळ (ता. महाबळेश्वर) येथील शेतकरी विठ्ठल रामचंद्र हिरवे यांचे घराने रात्रीच्या वेळी अचानक पेट घेतला. सारे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घरातील सर्व लोक जिवाच्या आकांताने घरा बाहेर पडले. ग्रामस्थ व युवकांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु त्या आधीच घरगुती साहित्य, जीवनावश्यक साहित्य, कपडे सर्व साहित्य जळून खाक झाले. अंगावरील कपड्यानिशी हे कुटुंब घराबाहेर पडले. एका रात्रीत हिरवे कुटुंब रस्त्यावर आले. महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ गावात शेतकरी विठ्ठल हिरवे यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत घरासोबत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. एका रात्रीत हिरवे कुटुंब रस्त्यावर आले. याची माहिती आमदार मकरंद आबा पाटील यांना समजताच त्यांनी तातडीने हिरवे कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावून गेले. यावेळी हिरवे कुटुंबीयांना तातडीची 50 हजार रुपयांची मदत देवून जळीतग्रस्त कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला. या कुटुंबाला दोन महिने पुरेल एवढा धान्यसाठा व इतर जीवनोपयोगी साहित्य तातडीने उपलब्ध करून दिले. महसूल विभागाला फोन करून तातडीने पंचनामा करणेबरोबरच या बेघर झालेल्या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत देण्याच्या सूचना केल्या.
यावेळी जिल्हाबँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपूरे, माजी सभापती संजय गायकवाड, रमेश चोरमले, गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.