गणेशोत्सव शांततेत व ‘डॉल्बीमुक्त’ साजरा करा पोलिस निरीक्षक हर्षद गालिंदे यांचे आवाहन
महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरासह तालुक्यातील आगामी सार्वजनिक गणेशोत्सव ‘डॉल्बीमुक्त’ वातावरणात शांततेत, उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करा. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची सर्व गणेशोत्सव मंडळांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी केले.
महाबळेश्वर पोलिस विभागाच्या वतीने शहर व तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक सह्याद्री रेस्ट हाऊस येथे घेण्यात आली. या बैठकीस वाई विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे आणि पोलिस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी गणेशोत्सव मंडळांना शासन तसेच पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या. यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे ‘डॉल्बीमुक्त’ वातावरणात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.
‘आदर्श गणेशोत्सव मंडळ’ कसे असावे, ध्वनीप्रदूषणाचे नियम, मिरवणुकीचे मार्ग, सुरक्षेच्या उपाययोजना तसेच वर्गणीसंदर्भातील नियमावली याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मंडप उभारणी, विद्युत सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि मिरवणुकीचे नियोजन करताना संबंधित विभागांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
उत्सव काळात नागरिकांना आणि गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही नागरी समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी पोलिस, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि महावितरण यांच्यात समन्वय ठेवण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
या बैठकीस महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, वैद्यकीय अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता उपस्थित होते.
महाबळेश्वर शहर व परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, विविध गावांतील पोलिस पाटील आणि स्थानिक प्रतिष्ठित नागरिक असे सुमारे १०० ते १२५ नागरिक बैठकीस उपस्थित होते. पोलिस प्रशासन आणि इतर नागरी विभागांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला जाईल, असा विश्वास मंडळांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.
या वेळी नगरसेवक राहुल पिसाळ, शिवसेना शहरप्रमुख (उद्धव ठाकरे गट) महेश गुजर, संदीप मोरे, शंकर ढेबे, अशोक शिंदे, राजेंद्र पवार, ओंकार पवार, राजेंद्र साळवी, संतोष चिकणे, आकाश साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे आवाहन
नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. ध्वनीप्रदूषण, मिरवणूक मार्ग, वाहतूक आणि सुरक्षेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची मंडळांनी काळजी घ्यावी, असे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांनी स्पष्ट केले.
मुख्याधिकाऱ्यांची सूचना
नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या
गणेशोत्सव मंडप उभारणी, सार्वजनिक जागेचा वापर, वाहतूक व्यवस्था आणि पालिकेशी संबंधित परवानग्यांसाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. उत्सव काळात नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, तसेच शहरातील स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील, याची गणेशोत्सव मंडळांनी दक्षता घ्यावी, असे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले.





