यशोदा टेक्निकल कॅम्पस व्यवस्थापन शास्त्र विभागात राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन, सहभागाचे आवाहन
सातारा : यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथील व्यवस्थापन विभागाच्या वतीने राज्यस्तरीय व्यवस्थापन स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि व्यवस्थापन कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जात आहे.
या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाच्या विविध पैलूंची माहिती मिळते तसेच त्यांची व्यावसायिक जगताची समज वाढते. भविष्यात यशस्वी व्यवस्थापक होण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी ओळखले पाहिजे. यामध्ये बिझनेस प्लॅन, बेस्ट एक्झिक्यूटिव्ह, बिझनेस, पोस्टर प्रेसेंटेशन, ऍडव्हर्टायझिंग शो यांसारख्या दहापेक्षा अधिक विविध स्पर्धांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापन विभागाच्या समन्वयकांनी केले आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असून त्यांच्या कौशल्यविकासाला चालना मिळेल. राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन हे विद्यार्थ्यांना उच्च स्तरावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि नवनवीन संधी जाणून घेण्यासाठी करण्यात आले आहे. व्यवस्थापन शास्त्राचे आजच्या काळातील महत्त्व लक्षात घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदरच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
वाढत्या जागतिकीकरणाच्या आणि सतत बदलणाऱ्या उद्योगक्षेत्राच्या मागणीनुसार व्यवस्थापन क्षेत्रात नवकल्पना, सर्जनशील विचार आणि समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता महत्त्वाची ठरते. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक वातावरणाची जाणीव होते तसेच उद्योग क्षेत्रातील नवीन ट्रेंड, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक धोरणांची समज वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे उद्योगजगताशी सुसंगत असे कौशल्यविकास घडतो व त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात.
या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानाची जोड मिळणार नाही तर त्यांच्यातील नेतृत्वगुणांना चालना मिळेल आणि भविष्यातील व्यावसायिक वाटचालीसाठी मजबुती मिळेल. असे प्रतिपादन यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा.दशरथ सगरे यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अशा प्रकारचे व्यक्तिमत्व विकासाचे जास्तीत जास्त उपक्रम हाती घेण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.
सदर स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक सन्मान चिन्ह तसेच विविध स्वरूपाच्या बक्षीसांनी विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
