यशोदा फार्मसीच्या गुणवत्तेची यशस्वी परंपरा कायम: प्रा. डॉ. दशरथ सगरे
विद्यार्थ्यांच्या यशाने पालक भारावले; ९६ विद्यार्थ्यांचे विशेष प्रावीण्यात यश
सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या बी.फार्म अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथील फार्मसी विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, प्राध्यापकांचे मार्गदर्शन, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टिकोनामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. या सर्व विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार समारंभ यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे यांच्या हस्ते पार पडला.
या परीक्षेत सय्यद अलिशा नजीरअहमद, माने रुचिता अरुण आणि गाढवे देशमुख अनुष्का बाळकृष्ण यांनी प्रत्येकी ८.९१ एसजीपीए मिळवत संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकावला. साबळे प्रणाली जीवन, पोतदार गौरव संजय, पवार नेहा शेखर आणि श्रुतिका सुनील दगडे यांनी प्रत्येकी ८.७३ एसजीपीए मिळवत संयुक्तरीत्या द्वितीय क्रमांक मिळविला. तर दोषी आर्या सचिन आणि देशमुख संपदा प्रकाश यांनी ८.६४ एसजीपीए मिळवत संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक पटकावला.
या निकालातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे फार्मसी विभागातील तब्बल ९६ विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन (विशेष प्रावीण्य) श्रेणीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे फार्मसी विभागाची शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची मेहनत आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेला यशोदा टेक्निकल कॅम्पसचा फार्मसी विभाग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि उद्योगाभिमुख फार्मसी शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनासाठी पोषक वातावरण, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विविध कौशल्यविकास उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, असोसिएट डायरेक्टर डॉ. रणधीरसिंह मोहिते, प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव आणि फार्मसी विभागप्रमुख डॉ. अविनाश भागवत यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचा विश्वास, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची अथक मेहनत यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संस्थेच्या शैक्षणिक वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढला असून, पुढील उच्च शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रातील संधींसाठी त्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे. यावेळी पालकांमधून अर्चना माने, अरुण माने, बाळकृष्ण देशमुख, जास्मिन सय्यद, नजीर अहमद सय्यद उपस्थित होते.
अंतिम वर्ष बी.फार्मच्या विद्यार्थ्यांनी संपादन केलेले हे यश गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी मार्गदर्शन, कौशल्यविकास आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक दृष्टिकोन यांची फलश्रुती आहे. या निकालामुळे यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या फार्मसी विभागाची गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा अधिक दृढ झाली आहे.
यावेळी प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करत भविष्यातील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि ध्येयाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. शिक्षणाची खरी परीक्षा केवळ गुणांमध्ये नसून, प्राप्त ज्ञानाचा समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी किती प्रभावीपणे उपयोग केला जातो यामध्ये आहे. फार्मसी क्षेत्रात वेगाने होत असलेल्या बदलांचा स्वीकार करून विद्यार्थ्यांनी संशोधन, नवोपक्रम आणि कौशल्यविकासावर भर द्यावा. यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेचा नावलौकिक उंचवावा, अशी अपेक्षा आहे.”




