सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम
सातारा : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपुलकीचा धागा मिळावा आणि त्यांचे मनोबल वाढावे, या उद्देशाने मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी सुमारे ५०० सैनिकांसाठी स्वतः तयार केलेल्या राख्या आणि मिठाई पाठविली.
मागील वर्षाप्रमाणे यंदाही संस्थेच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. फॅशन डिझाईनिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक राख्या तयार केल्या, तर हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या विद्यार्थ्यांनी मिठाई तयार केली. या राख्या व मिठाई सैनिकांपर्यंत पाठविण्यात आल्या.
अनेकदा कर्तव्यामुळे सैनिकांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीला भेटणे शक्य होत नाही. काही वेळा फोन किंवा संदेशाच्या माध्यमातून रक्षाबंधन साजरे करावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी राख्या व मिठाई पाठवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमामुळे सैनिकांना आपुलकीची जाणीव होऊन त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
राख्या तयार करताना शिक्षिका जानवी कासार, अश्विनी गायकवाड, धनवी जोशी, संकेत नलावडे, प्रतीक शेलार, अर्जुन गंगावणे, राहुल नांदेडकर तसेच प्राचार्य अनिल चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.




