योग्य प्रॉम्प्ट देत रहा; जे तुम्ही ठरवाल तेच होणार डॉ. राजेंद्र मोरे यांचे प्रतिपादन ‘एन्जॉय एक्झाम टेक्निक्स’ कार्यशाळेस साताऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा – ‘आपला मेंदू आपण देत असलेल्या ‘प्रॉम्प्ट’वर कार्य करतो. त्यामुळे स्वतःला सातत्याने सकारात्मक, योग्य आणि प्रेरणादायी प्रॉम्प्ट द्या. मग तुम्ही जे ठरवाल, ते साध्य होण्याचा मार्ग नक्कीच तयार होईल,’ असा प्रेरणादायी संदेश सेवानिवृत्त सेनाधिकारी तथा अपशिंगे गावचे भूमिपुत्र डॉ. राजेंद्र मोरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे आयोजित ‘एन्जॉय एक्झाम टेक्निक्स’ या एकदिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपप्राचार्य नंदिनी साळुंखे, रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे सहायक विभागीय अधिकारी एन. टी. निकम तसेच पर्यवेक्षक रवींद्र खोत यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मोरे म्हणाले, ‘परीक्षेचा अभ्यास ही अवघड गोष्ट नाही. अभ्यासाची संकल्पना मेंदूपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचली, तर यश निश्चित मिळते. परीक्षा हा खेळ नसला तरी तिच्याकडे खिलाडूवृत्तीने पाहणे आवश्यक आहे. परीक्षेची भीती मनातून काढून टाका आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. आत्मविश्वासाइतकी मोठी शक्ती दुसरी नाही.’
कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात उपस्थित राहण्याचे, आवडत्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्याचे, वेळेचे योग्य नियोजन करण्याचे आणि मोबाईलसह सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. “खाजगी क्लासेस आणि कोचिंगच्या वाढत्या प्रभावातही महाविद्यालयीन शिक्षणाची उपयुक्तता कायम आहे. पालकांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळेच विद्यार्थी जीवनात ‘टॉपर’ होऊ शकतो,” असेही त्यांनी सांगितले.
शुक्रवार (ता. १०) रोजी कर्मवीर सभागृहात झालेल्या या कार्यशाळेची सुरुवात अंतर्मनाला सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या प्रार्थना गीताने झाली. पुणे येथील ‘ओयासिस कौन्सेलर्स’च्या तज्ज्ञ टीमने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे प्रभावी तंत्र, उजळणीचे महत्त्व, गृहपाठ, आत्मपरीक्षण, सकारात्मक संवाद, भरपूर पाणी पिण्याचे फायदे, स्टडी ग्रुपची उपयुक्तता, समर्पण भावना आणि संतुलित जीवनशैली याविषयी संवादात्मक व आनंददायी पद्धतीने मार्गदर्शन केले.
डॉ. राजेंद्र मोरे यांनी विविध प्रेरणादायी उदाहरणे तसेच दृकश्राव्य माध्यमांतील व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्सच्या साहाय्याने विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करताना त्यांनी, “विद्यार्थीदशा हा आयुष्यातील सर्वात सुंदर आणि घडणारा काळ आहे. स्वतःला कधीही कमी समजू नका. शिक्षकांना वारंवार प्रश्न विचारा, संकल्पना स्पष्ट करून घ्या आणि सादरीकरणावर भर द्या,” असा सल्ला दिला.
‘आयुष्यात दुसरी संधी मिळाली तर इतरांना माफ करा, स्वतःही माफी मागण्याची तयारी ठेवा. मनात कोणाबद्दलही राग किंवा अढी ठेवू नका. आई-वडिलांच्या संस्कारांचा विसर पडू देऊ नका. प्रत्येक व्यक्तीचा डीएनए वेगळा असतो. त्यामुळे स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहा आणि प्रत्येक यशाचे मनापासून सेलिब्रेशन करा,’ असा जीवनमूल्यांचा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी प्रणिती पडवळ, श्रावणी सावंत, श्रावणी जाधव, प्रयाग उबाळे आणि सुजल कदम या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत कार्यशाळा अत्यंत प्रेरणादायी व उपयुक्त ठरल्याची भावना व्यक्त केली. कार्यशाळेचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला. विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत ‘जय हिंद’च्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.
आगामी १५ व १६ जुलै रोजी होणाऱ्या पुढील कार्यशाळांचा सातारा परिसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्राचार्य डॉ. नंदिनी साळुंखे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे प्रमुख प्रा. विवेक राऊत, ‘ओयासिस’ टीमचे सचिन पवार, प्रा. अविनाश ढेबे, प्रा. महेश बाबर, प्रा. विवेक पवार, प्रा. सचिन मांडके, मिलिंद डिंगणे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. अमृता वरेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पी. बी. सरगडे यांनी आभार मानले.




