काँगेसला बळकट करण्यासाठी जोमाने काम करणार-विराज शिंदे
वाई – पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशाचा सन्मान करुन वाई विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कॉंग्रेसचे नेते विराज शिंदे यांनी सांगितले आहे. वाई मतदारसंघ जागावाटपात काँग्रेसला सुटणे अपेक्षित होते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी तसे प्रयत्न देखील केले. परंतु त्यांना यश आले नाही ही दुर्दैवाची बाब आहे. त्यांनी माझ्या उमेदवारीसाठी अगदी दिल्लीपर्यंत शब्द टाकला याबद्दल मी कृतज्ञ आहे असेही विराज शिंदे म्हणाले.
उमेदवारी दाखल करण्याबाबत कार्यकर्ते आग्रही होते. पण मी कॉंग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पक्षशिस्त मोडण्याची बाब मनाला शिकवणारी नाही. माझ्या उमेदवारीसाठी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब, विजय वडेट्टीवार साहेब यांनी खुप प्रयत्न केले.माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यासाठी ही अतिशय मोलाची बाब आहे असेही शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी पूर्ण तयारी होती, प्रचाराची एक फेरीही मी परिवर्तन निर्धार यात्रेच्या माध्यमातून केली होती. मात्र ही जागा काँग्रेस पक्षाला न मिळाल्याने मला उमेदवारी मिळू शकली नाही. आपण अपक्ष उमेदवार म्हणून लढावं असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता, मात्र वरिष्ठ नेत्यांनी संवाद साधून मला विश्वासात घेतले. वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान देऊन मी यापुढेही काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे.” अशी भूमिका विराज शिंदे यांनी जाहीर केली आहे.
