वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, नऊ भाविकांचा मृत्यू; अनेक जखमी
(आंध्रप्रदेश) :आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील ऐतिहासिक श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एकादशीनिमित्त भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत (Stampede) नऊ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सुमारे डझनभर लोक जखमी झाले आहेत. ही घटना आज, शनिवार,१ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एकादशीमुळे पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी आत प्रवेश मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली, ज्यामुळे अचानक चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यात अनेक भाविक खाली कोसळले आणि गर्दीच्या रेट्यात चिरडले गेले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवले असून, परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे आणि मंदिर व्यवस्थापनाच्या नियोजन आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.




