एसटीच्या ७६व्या वर्धापन दिनानीमित्त आज महाबळेश्वर आगाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
महाबळेश्वर, ता:१:एसटीच्या ७६व्या वर्धापन दिनानीमित्त आज महाबळेश्वर आगाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापन दिनानीमित्त महाबळेश्वर बस स्थानकाची आकर्षकपणे सजावट करण्यात आली होती. बसस्थानक परिसरात रांगोळी काढण्यात आली होती. आज वर्धापन दिनानिमित्त आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांच्या हस्ते प्रतापगड दर्शन बसचे पूजन करण्यात आले. बसस्थानकावरील प्रवाशांना गुलाबपुष्प व पेढे वाटण्यात आले. केक कापून एसटीचा ७६ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी आगार लेखाकार महेश शिंदे, स्थानक प्रमुख शाहरुख खान, सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ, वरिष्ठ लिपिक विकास कांबळे, अजित जमदाडे, प्रदीप बाबर, शेखर कांबळे, शंकर सूर्यवंशी संतोष ढेबे,योगेश पारखी, सुदर्शन शिंदे, सचिन शिंदे,दीपक भिसे, किरण जगताप आदींची उपस्थिती होती.
यावेळी आगार व्यवस्थापक कांबळे म्हणाले, गेल्या ७६वर्षांपासून एसटी ही महाराष्ट्र राज्याची लोकवाहिनी व जीवनवाहिनी म्हणून अविरतपणे काम करत आहे. फायदा-तोट्याचा विचार न करता दुर्गम खेड्यापाड्यात सुरक्षितपणे सेवा देण्याचे काम एसटी महामंडळ करत असते. प्रवासी हा केंद्रबिंदू समोर ठेवून प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध असून प्रवाशांनी लालपरीच्या उत्पन्नवाढीसाठी आपले योगदान देऊन ही लोकवाहिनी अधिक मजबूत करावी. यावेळी प्रवासी,एसटीचे कामगार उपस्थित होते.