उडतरे –खडकी–पाचवड–उडतरे येथे चोरट्यांचा धुमाकूळ
वाई तालुक्यातील उडतरे–खडकी–पाचवड परिसरात गुरुवारी चोरट्यांनी भर दिवसा दुपारी १.३५ च्या दरम्यान तीन घरे फोडण्याचा प्रयत्न केला.खडकी येथील एका बंद घराची कडी उघडून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खडकी येथील वैभव विष्णू शिंगटे हे त्यांच्या मुलांसह शेतात गुरांना चारा आणण्यासाठी गेले असता त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करुन एक नेकलेस,दोन अंगठ्या आणि कर्णफुले असा सुमारे २,२०.०००/- रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.त्यांनंतर तेथून उडतरे आणि पाचवड येथील अन्य दोन ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक रमेश गर्जे आणि पोलिस पथक ,घटनास्थळी रवाना झाले. त्यासोबत ठसे तज्ञ आणि श्वान पथक ही पाचारण करण्यात आले .त्या संदर्भात अज्ञात चोरट्याविरुद्ध भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिस यंत्रणा अधिक प्रयत्न करत आहे.या भागात अशा घटना घडत असल्यामुळे पोलिस प्रशासनाकडून रात्री गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या घटनेचा अधिक तपास भुईंज पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक पी.पी. पाटील हे करत आहेत.




