मुंबईकरांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत; बेस्ट प्रवासाचे दर कमी करणार, महिला व विद्यार्थ्यांना मोफत प्रवास. मुंबईचे ‘मुंबईपण’ अधोरेखित करणार! शिवशक्ती’चा वचननामा जाहीर
मुंबई : मुंबईचे ‘मुंबईपण’ अधोरेेखित करताना १०० युनिटपर्यंत बेस्टच्या ग्राहकांना मोफत वीज, बेस्टच्या बस प्रवासाचे दर कमी करणे, विशेष बसेसमध्ये महिला व विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, ७०० चौरस फुटापर्यंत मालमत्ता कर माफ अशा विविध आश्वासनांचा ‘मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा’ रविवारी प्रसिद्ध करण्यात आला.
शिवसेना (ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वचननामा उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. ‘शब्द ठाकरेंचा’ असे या वचननाम्याला नाव देण्यात आले असून, मुखपत्रावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव व राज ठाकरे बंधूंचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुंबईकरांसाठी हा ‘शिवशक्तीचा वचननामा’ असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मुंबईचे मुंबईपण जपण्यासाठी शहराची जुनी ओळख कायम ठेवली जाईल.
या वचननाम्याच्या निमित्ताने मुंबईतील जमिनी या मुंबईकरांसाठीच राहतील असे आश्वासन देण्यात आले आहेत. महापालिकेच्या जमिनी या खासगी विकासकांच्या घाशात न घलता त्याठिकाणी शासकीय महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच गिरणी कामागारांना घरे देण्यात येतील. मुंबई महापालिकेचे स्वतंत्र गृहनिर्माण प्राधिकरण असेल.
पुढील पाच वर्षांत १ लाख मुंबईकरांना परवडणारी घरे दिली जातील असे म्हणत मुंबईकरांचा घरांच्या प्रश्नांना वचननाम्यात प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा स्वाभिमान निधी देण्यात येईल. कोळी-मच्छीमार महिला विक्रेत्यांना अर्थसाह्य व नवीन परवाने देऊन समुदायांतर्गत हस्तांतरणाची सोय उपलब्ध करून दिले जाईल. कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त १० रुपयांत नाश्ता व जेवण देणारी ‘माँ साहेब किचन्स’ सुरू करण्याचे उद्दिष्ट वचननाम्यातून देण्यात आले आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर दर दोन किलोमीटरवर महिलांसाठी आधुनिक स्वच्छतागृहे, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन्स आणि बालकांसाठी सोयी असतील. कामकाजी पालकांसाठी पाळणाघरे, तसेच प्रत्येक विभागात पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क आणि पेट क्लिनिक उभारले जातील. तरुणांसाठी ‘बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार योजना’ राबवली जाईल.
१ लाख तरुणांना २५ हजार ते १ लाख रुपये अर्थसहाय्य आणि गिग वर्कर्सना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देण्याचे प्रस्तावित केले आहे. घरधारकांना दिलासा देत ७०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ, तर पर्यावरणस्नेही सोसायट्यांना करसवलत देणार असल्याचे आश्वासन ठाकरे बंधूंनी वचननाम्यातून दिले आहे. महापालिकेच्या शाळा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही असे सांगत मुंबईकरांवर लादण्यात आलेला कचरा करही रद्द करणार असल्याचे म्हटले आहे.
*मोफत पार्किंग सुविधा*
मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूकोंडीची २०० ठिकाणे निश्चित करून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाहतूककोंडीची समस्या सोडवण्याचे आश्वासन देताना मुंबईकरांना महापालिकेच्या वाहनतळांमध्ये मोफत पार्किंग सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. नव्या पुनर्विकसित इमारतींमधील प्रत्येक घराला पार्किंग सुविधा बंधनकारक करणार असल्याचे म्हटले आहे.
*आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र*
मुंबईचा भाग असलेल्या पूर्व किनाऱ्यावरील बीपीटीच्या सुमारे १८०० एकरच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय उद्योजकता आणि वित्तीय केंद्रावर सागरी पर्यटन केंद्र उभारण्यात येईल. त्याचप्रमाणे मुंबईतून गुजरातला नेलेले आर्थिक वित्तीय केंद्र मुंबईत पुन:स्थापित करण्याचे तसेच ऑलिम्पिक दर्जाचे क्रीडा संकूल उभारण्याचे आश्वासन देण्यात आहे.
खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास
मुंबईकरांना खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास करता येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. महायुती सरकारच्या काळात झालेली बेस्टची दरवाढ कमी करून ५-१०-१५-२० रुपये असे तिकिटाचे दर ठेवले जातील. जुने मार्ग पुन्हा सुरू करणार तसेच विशेष बसेसमध्ये महिला व विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाचे आश्वासन देण्यात आले आहे.




