13 गावांच्या पाण्यासाठी विधानसभेत आवाज, ‘पाणीदार आमदार’ मनोजदादांचा शेतकऱ्यांकडून आंब्याचे झाड देऊन सत्कार

कराड -दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कराड व कोरेगाव तालुक्यातील 13 गावांना जिहे-कठापूर व टेंभू उपसा सिंचन योजनेतून तातडीने पाणी मिळावे, ही मागणी ‘पाणीदार आमदार’ मनोजदादा घोरपडे यांनी पावसाळी अधिवेशनात जोरदारपणे मांडली. त्यांच्या या आक्रमक पाठपुराव्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार घोरपडे यांचा आंब्याचे झाड भेट देऊन अनोख्या पद्धतीने सत्कार केला.
कोरेगाव तालुक्यातील अपशिंगे, अंभेरी, बेलेवाडी, वेळू, पवारवाडी,जयपूर,पिंपरी, आर्वी व कोंबडवाडी या 9 गावांना _जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेतून_ तर कराड तालुक्यातील कोरेगाव, टेंभू, सयापूर व कामथी या 4 गावांना _टेंभू उपसा सिंचन योजनेतून_ पाणी मिळावे, अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
या भागातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांपासून अनियमित पाऊस, वारंवार येणारा दुष्काळ आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्याना शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची अडचण होते.
“या दोन्ही योजनांचे पाणी मिळाले तर ते आमच्यासाठी जीवनदायी ठरेल. या 13 गावांचा योजनांमध्ये समावेश झाल्यास हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
विधानभवनात आवाज उठवला
या पार्श्वभूमीवर आमदार मनोजदादा घोरपडे यांनी अधिवेशनात लक्षवेदीने हा मुद्दा उपस्थित केला. “या गावांचा तातडीने योजनेत समावेश करून निधी उपलब्ध करून द्यावा. योजना पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करावी,” अशी आग्रही मागणी त्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली.यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार घोरपडे यांच्या मागणीनुसार उत्तर मधील या गावांना लवकरच पाणी उपलब्ध करून देऊ अशी सभागृहात ग्वाही दिली
आमदारांच्या या भूमिकेमुळे भारावून गेलेल्या शेतकऱ्यांनी कराड येथे त्यांची भेट घेऊन आंब्याचे रोपटे भेट देत सत्कार केला. “आंबा हा समृद्धीचे प्रतीक आहे. आमदार साहेबांमुळे आमच्या शेतातही समृद्धीचा आंबा बहरेल,” अशी भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.




