यंदा 12 ते 29 जानेवारीदरम्यान होणार मांढरदेवच्या श्रीकाळूबाईची यात्रा; पशुबळी आणि वाद्य वाजविण्यावर बंदी
मांढरदेव यात्रेला रविवारपासून सुरूवात :वाई तालुक्यातील मांढरदेवी (काळूबाई देवी) यात्रा रविवारपासून (१२ जानेवारी) सुरू होत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत.
काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते, तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात. श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचेच रूप आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस चुकते करणारे भाविक-भक्त वर्षभर येत असतात.
कोंबड्या, बकऱ्यांची वाहतूक आणि हत्या, झाडाला खिळे ठोकणे, लिंबू, बाहुल्या अडकविण्यावर बंदी आहे. अशा प्रकारांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर राहणार आहे. भेसळयुक्त पदार्थांची विक्री टाळण्यासाठी अन्न, औषध प्रशासनाची भरारी पथके नेमण्यात आली आहेत. १२ ते १४ जानेवारीपर्यंत ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. तसेच भाविकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.