जगातील पहिले कवितांचे गाव – माझं कवितांचं गाव जकातवाडी, राजधानी सातारा येथे जागतिक कविता दिनानिमित्त भव्य काव्य महोत्सव उत्साहात संपन्न
सातारा-जगातील पहिले कवितांचे गाव म्हणून ओळख मिळविणाऱ्या “माझं कवितांचं गाव जकातवाडी, राजधानी सातारा” येथे जागतिक कविता दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय काव्य महोत्सव व साहित्य संमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या भव्य काव्य महोत्सवात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून ८० हून अधिक कवी-कवयित्री सहभागी झाले होते. “जिथे प्रत्येक भिंत बोलते” या घोषवाक्याला साजेसा हा उपक्रम ठरला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे माननीय अमोल मोहिते (नगराध्यक्ष, सातारा) यांच्या हस्ते पार पडले. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व कवी ह. बा. शिंदे उपस्थित होते, तर स्वागताध्यक्ष चंद्रकांत सणस यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी सरपंच अश्विनी दळवी, उपसरपंच रामकृष्ण घोरपडे, वाचनालयाचे कार्यवाह नामदेव लोंढे तसेच मुख्याध्यापक विजय कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याच प्रसंगी कवितेच्या गावाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे या साहित्यिक चळवळीच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला.प्रमुख पाहुणे अमोल मोहिते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “जकातवाडी हे जगातील पहिले कवितांचे गाव असल्याचा आम्हाला अभिमान आहे. ही साताऱ्यासाठी अभिमानाची बाब असून, या उपक्रमासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल.”
स्वागताध्यक्ष चंद्रकांत सणस यांनी गावकऱ्यांच्या वतीने सर्व मान्यवर, कवी-कवयित्री आणि उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी व्यस्त कामातून ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले बांधकाम मंत्री यांनी शुभेच्छा संदेश पाठवून कवितेच्या गावासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आपल्या संदेशात सांगितले आहे सणस यांनी सांगितले
कवितेच्या गावचे अध्यक्ष प्रल्हाद पारटे यांनी सांगितले की, कवींच्या कविता, त्यांच्या जन्मगावांचा इतिहास व छायाचित्रांसह जतन करण्याचे कार्य हाती घेतले जाणार आहे. तसेच जकातवाडीला साहित्यिक पर्यटनाचे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास नेरकर यांनी कवितेच्या गावाच्या शाखा राज्यातील विविध जिल्ह्यांत सुरू होत असल्याची माहिती देत, भविष्यात परदेशातील मराठी भाषिकांपर्यंत ही चळवळ पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच कवींनी आपल्या कविता जनमानसात पोहोचवण्यासाठी शाळांना भेट देण्याचे आवाहन केले.
संमेलनाध्यक्ष ह. बा. शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “कवितांचे गाव जकातवाडी साहित्य क्षेत्रात कविता जनमानसात पोहोचवण्याचे कार्य नक्कीच करेल.” यासाठी कवींनी आपल्या कविता अधिक दर्जेदार तयार कराव्यात, असे त्यांनी आवाहन केले.
यानंतर रंगलेल्या कवी संमेलनात ग्रामीण जीवन, निसर्ग, सामाजिक प्रश्न, स्त्रीशक्ती, देशभक्ती अशा विविध विषयांवरील कविता सादर करण्यात आल्या. प्रत्येक सादरीकरणाला उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.यावेळी कवितांच्या गावासाठी विविध जिल्ह्यांतील शाखांच्या पदग्रहणाचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना पोटे, संदीप रासकर व राजेंद्र पाटील यांनी प्रभावीपणे केले. आयोजन समितीचे विश्वास नेरकर, सुषमा आले करी, वसंत शिंदे, राजेंद्र पाटील, अनिता भोसले, प्रज्ञा रोकडे, वैशाली पारटे यांनी उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.
या यशस्वी आयोजनासाठी शैलेश महाडिक, वैष्णवी पारटे, रविराज चव्हाण, राहुल दौंडे, ओवी पारटे, गीताबाई पारटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.हा सर्व कार्यक्रम विद्या वर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालयात संपन्न झाला. यावेळी वाचक, ग्रामस्थ आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी आयोजकांनी सर्व सहभागी कवी-कवयित्री, मान्यवर, ग्रामस्थ व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.हा काव्य महोत्सव जकातवाडीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारा ठरला असून, भविष्यात अशा अनेक साहित्यिक उपक्रमांची नांदी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




