पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न
पुढील वर्षासाठीच्या ८२० कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आराखड्यास मान्यता
सातारा : आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२५-२६ साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत ७१२.३५ कोटी रुपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमअंतर्गत १०६.२८ कोटी रुपये व आदिवासी क्षेत्र बाह्यघटक कार्यक्रमअंतर्गत २.०८ कोटी रुपये अशा एकूण ८२०.७१ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून या प्रारूप आराखड्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये सन २०२५-२६ साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणअंतर्गत शासनाने ठरवून दिलेली वित्तीय मर्यादा ४८६.२५ कोटी रुपयांची असून यामध्ये जिल्हास्तरावरील विविध विकास योजनांसाठी २२६.१० कोटी रुपये वाढीव निधीची मागणी असा एकूण ७१२.३५ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा आहे. वाढीव निधी मिळवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय व लोकप्रतिनिधींसह दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या वित्त व नियोजन मंत्री मा. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय बैठकीमध्ये प्रयत्न करणार आहे, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी व्यक्त केला.
सन २०२४-२५ साठी सर्व मंजूर निधी विहित मुदतीत १०० टक्के खर्च होईल व त्यातून होणारी विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असतील याची सर्वतोपरी दक्षता घ्यावी, असे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिले. तसेच महावितरण कंपनीने निधी उपलब्ध नाही या कारणास्तव मंजूर कामे चालू करण्याचे थांबवू नयेत; मंजूर निधी टप्याटप्याने येत राहील. शेती पंपासाठी विद्युत पुरवठ्याची कामे गतीने पूर्ण करावीत. जलजीवन मिशनअंतर्गत आराखड्यामधील कामांच्या १५ टक्के वाढीव रकमेच्या कामांना शासनाची मान्यता घेणे, तसेच १५ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम लागणाऱ्या कामांच्या मान्यतेसाठी मा. पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे बैठक घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी सूचना दिल्या. तसेच कराड उपजिल्हा रुग्णालयाची सुधारणा करणे, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, रहिमतपूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करणे अशा मा. आमदार महोदयांनी उपस्थित केलेल्या विषयांवरदेखील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. जयकुमारजी गोरे, खासदार मा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार मा. नितीनजी पाटील, दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार मा. धैर्यशीलजी मोहिते-पाटील, आमदार मा. शशिकांतजी शिंदे, मा. जयंतजी आसगावकर, मा. डॉ. अतुल भोसले, मा. मनोजजी घोरपडे, मा. सचिनजी पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
