माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग
आमदार शशिकांत शिंदे यांचे आमदार महेश शिंदे यांच्या आरोपांना उत्तर
सातारा –मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्या घोटाळ्याचा उल्लेख विरोधक करतात, त्याचा आणि माझ्यासह बाजार समितीतील संचालकांचा काडीमात्र संबंध नाही. ऐन लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघांमध्ये खासदार शरद पवार यांच्या पाठीशी मोठ्या संख्येने जनता उभी राहिली, हे पाहून विरोधकांनी षडयंत्र रचून माझ्यावर बेछूट आरोप केले आहेत, अशी टीका महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.
येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळसकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मुंबई बाजार समितीचे अनुषंगाने आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले लोकशाहीमध्ये निवडणूक आल्या की आरोप प्रत्यारोप होतात. मात्र, सध्या यंत्रणेचा वापर करून राजकीय विश्वासहर्ता संपविण्याचा घाणेरडा प्रयत्न आरोप करणाऱ्यांकडून होत आहे. ज्या चार हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत आरोप करणारे बोलत आहेत, त्याबाबत दोषी कोण आहेत, हेच ठरलेले नाही. मी आत्तापर्यंत सुसंस्कृत राजकारणाचा प्रयत्न केला. माणूस मोठा झाला की काही लोकांमध्ये असूया निर्माण होते. सरकारी यंत्रणेचा वापर करून बाजार समितीतील घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे न्यायदेवतेकडे न्याय मागावा लागला. बाजार समितीतील आमचे संचालक मंडळ 2008 मध्ये अस्तित्वात आले आहे. तर व्यापाऱ्यांना गाळेवाटप हे 1990 मध्ये झालेले आहे. ह्या व्यापाऱ्यांना बाजार समितीतील त्यांचा वाढीव एफएसआय हवा होता, त्यामुळे त्यांनी बाजार समितीकडे अर्ज केला होता. बाजार समितीचे संचालक मंडळाने त्याच्यावर ठराव करून तो पणन मंत्रालयाला पाठवला होता. भाजपचे नेते तत्कालीन पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्याला मान्यता दिली होती. या प्रस्तावाला पर्यावरण दिल्ली यांची मागणी घेतली होती.त्यानंतर सिडको महानगरपालिकेला योग्य तो कर भरला होता आणि बाजार समितीने व्यापाऱ्यांकडून चेक ने पैसे घेऊन ते खात्यावर भरलेले आहेत. हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मग विरोधक चुकीचे आरोप कशासाठी करत आहेत? निवडणुकीनंतर खोटे आरोप करणाऱ्यांच्या विरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करणार आहे, असा इशाराही शिंदे यांनी दिला.
शशिकांत शिंदे म्हणाले…
– जनतेच्या मैदानात लढूया रडीचा डाव कशाला खेळताय
– ज्यांना खुर्चीवर बसवले तेच उलटले
– घोटाळे संबंधात ज्या तक्रारदाराने आरोप केले होते त्याला आत्महत्या करण्यास कोणी भाग पाडले याची चौकशी व्हावी
– उदयनराजे राष्ट्रवादीत असताना त्यांचा केलेला प्रचार त्याचाच संबंधितांना राग
– जामीन घेतला नसता तर सत्ताधाऱ्यांनी सहा महिने कैदेत बसवले असते
-आमचा दोष नसताना आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होतोय
-चार हजार कोटींचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर राजकारणातून निवृत्ती घेईन
-गांधी मैदानावर कशाला मुंबई बाजार समितीत समोरासमोर येऊन बोलू
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
मुंबई बाजार समितीच्या घोटाळ्यात दोषी कोण? हे अजून ठरलेले नाही
या प्रकरणात राजकीय अधिकाराचा गैरवापर केला जातोय
वास्तविक एफएसआय च्या घोटाळ्यासंदर्भात आरोप होतोय तो एफएसआय अजूनही बाजार समितीच्या ताब्यात
या घोटाळ्याप्रकरणी संचालकांचा दोष नाही असे पणन संचालकांचे स्पष्टीकरण
व्यापाऱ्यांचे 62 कोटी रुपये बाजार समितीत सुरक्षित
व्यापाऱ्यांना 1990 सालीच गाळेवाटप
विद्यमान संचालकांचा गाळेवाटपाशी संबंध नाही
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व अनेक दिग्गज मंडळींनी केले. पण सध्याचा लोकप्रतिनिधी हा अत्यंत बालिश आणि भंपक लोकप्रतिनिधी मतदारसंघाला भेटला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ही परिस्थिती बघायला मिळते आहे.
– बाळासाहेब सोळसकर