तेलंगणा हादरले भयंकर अपघात! प्रवासी बस-टिप्परच्या धडकेत 17 ठार!
तेलंगना भीषण अपघाताने हादरले असून सोमवारची पहाट काळजाला चिरणारी ठरली. रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला-मिरजगूडा मार्गावर आज ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ७:३० च्या सुमारास काळ आला आणि त्याने रस्त्यावर अक्षरशः रक्ताचे पाट वाहिले. भरधाव वेगाने आलेल्या एका खडी भरलेल्या टिप्पर लॉरीने तंदूर डेपोच्या RTC एक्सप्रेस बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात १७ निष्पापांचा बळी गेला असून घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे.
धडक इतकी भीषण होती की, क्षणार्धात टिप्पर बसवर उलटला आणि त्यातील टनावारी खडीचा जीवघेणा डोंगर निष्पाप प्रवाशांवर कोसळला. बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आणि अनेक प्रवासी खडीखाली जिवंत गाडले गेले. या दुर्घटनेत १७ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे, ज्यात एका चिमुकल्या तीन महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. या अपघाताने संपूर्ण तेलंगणा राज्य शोकाकूल झाले आहे.
प्राथमिक तपासात, टिप्पर चालक चुकीच्या दिशेने किंवा भरधाव वेगाने वाहन चालवत असताना हा अपघात घडला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
वेगवान टिप्पर लॉरी (खडी भरलेली) तंदूर डेपोतून हैदराबादकडे जाणाऱ्या एक्सप्रेस बसला धडकली. धडकेनंतर टिप्पर बसवर उलटला आणि त्यातील संपूर्ण खडीचा भार बसवर पडला, ज्यामुळे बसचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि अनेक प्रवासी दबले गेले. या अपघातात टिप्पर चालकासह एकूण १७ लोक ठार झाले. मृतांमध्ये तीन महिन्यांच्या मुलीचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने स्थानिक आणि हैदराबादमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
या भीषण अपघाताच्या माहितीनंतर तेलंगणा सरकार आणि पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी तातडीने मुख्य सचिव (CS) आणि पोलीस महासंचालक यांना घटनास्थळी पोहोचून तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश दिले.जखमींवर उपचार सुरु.
मुख्यमंत्र्यांनी जखमींना तातडीने हैदराबादला हलवून त्यांना उत्तम वैद्यकीय उपचार पुरवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, उपलब्ध मंत्र्यांना तातडीने अपघातस्थळी भेट देण्यास सांगितले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जेसीबी मशीनच्या साहाय्याने अडकलेल्या मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. बिजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे.




