टँकरग्रस्त गावांना ‘जलयुक्त शिवार 3.0’मध्ये प्राधान्य!
मुबंई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे मृद व जलसंधारण विभागाची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास, शेतीची उत्पादकता वाढवणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधून जलसुरक्षा सुनिश्चित करण्याबाबत चर्चा झाली.
महाराष्ट्रातील मागील 5 वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियान 3.0 मध्ये प्राधान्याने समावेश करून, या गावांमध्ये जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्यावीत, तसेच या गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाची कामे निश्चित करावीत असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील सूक्ष्म पाणलोट क्षेत्रांचा विकास आणि जलस्रोतांचे बळकटीकरण याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. ज्या प्रकल्पांची कामे निश्चित करण्यात आली आहेत, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. या कामांना प्राधान्याने गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, त्यामुळे जलसंधारणाची कामे अधिक परिणामकारकपणे आणि थेट पद्धतीने पूर्ण करता येतील.
जलस्रोतांच्या बळकटीकरणामुळे निर्माण झालेला सकारात्मक परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जलसंधारणाशी संबंधित यशकथा तयार करून त्यांचा प्रभावी प्रसार करावा, असेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी मंत्री संजय राठोड व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





