सुनीता विल्यम्स यांना परत आणण्यासाठी एलॉन मस्क यांचं अंतराळयान ISS मध्ये दाखल, परतीचा प्रवास कधी
नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी, आंतरराष्ट्रीय आंतराळ केंद्र म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये (ISS) गेले होते. परंतु, त्यांना अंतराळात जाऊन आता नऊ महिने उलटून गेले तरी ते अद्याप परत आलेले नहीत. त्यांच्या अवकाशयानात बिघाड झाल्यामुळे त्यांना तिथेच थांबावं लागलं. विल्यम्स व विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्याचे प्रयत्न चालू असून पुढच्या आठवड्यात दोघेही पृथ्वीवर परततील.
सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्स या कंपनीने त्यांचं स्पेस क्राफ्ट क्रू-१० पाठवलं असून हे अवकाश यान आज दुपारी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये दाखल झालं. या अवकाश यानातून एकूण चार अंतराळवीर व इतर कर्मचारी ISS मध्ये गेले आहेत. क्रू-१० आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात दाखल होताच विल्यम्स व विल्मोर यांनी सर्व नव्या सहकाऱ्यांचं जोरदार स्वागत गेलं. या सर्वांना पाहून विल्यम्स व विल्मोर यांना खूप आनंद झाला. सर्वांनी एकमेकांना आलिंगन दिलं. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील या भेटीचा व्हिडीओ नासाने शेअर केला आहे.
क्रू-१० वरील अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात काही वेळ संशोधन करतील. विल्यम्स व विल्मोर यांनी केलेलं संशोधन व माहिती ताब्यात घेतील. त्यानंतर १९ मार्च रोजी विल्यम्स व विल्मोर या दोघांना घेऊन परतीचा प्रवास सुरू करतील. शुक्रवारी (१४ मार्च) क्रू-१० ने फाल्कन-९ रॉकेटच्या माध्यमातून उड्डाण केलं होतं. १९ तारखेला आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र सोडल्यानंतर २१ ते २३ मार्चच्या दरम्यान सहा अंतराळवीर पृथ्वीवर परततील.
Dragon स्पेसक्राफ्टद्वारे नासाचे कमांडर अॅनी मॅक्क्लेन, पायलट आयर्स, जपानी अंतराळ संशोधन संस्थेतील अंतराळवीर ताकुया ओनिशी आणि रशियाचे अंतराळवीर कोस्मोनॉट आयएसएसमध्ये दाखल झाले आहेत. परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर त्यांचं अंतराळयान अंटलांटिक महासागरात उतरवलं जाऊ शकतं.
